महिलांचा लक्षणीय सहभाग; वाहतूक व्यवस्था कोलमडली

मैत्रेयच्या विविध कंपन्यांमध्ये ग्राहकांनी गुंतविलेली रक्कम परत मिळावी, या मागणीसाठी मैत्रेय ग्राहक आणि प्रतिनिधी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा काढण्यात आला. पावसाची संततधार झेलत शेकडो मोर्चेकरी रेनकोट अन् छत्रींचा आधार घेत उस्फूर्तपणे सहभागी झाले. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चामुळे मध्यवर्ती रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. मोर्चेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन देत आपल्या व्यथा मांडल्या.

नाशिक जिल्ह्यातील नाममात्र परतावावगळता मैत्री सुवर्णसिद्धी, मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स सव्‍‌र्हिसेसचा नाशिकसह देशातील गुंतवणूकदारांना परतावा अद्याप मिळालेला नाही. परतावा न मिळाल्याने आर्थिक कोंडीत अडकलेल्या ५०० हून अधिक गुंतवणूकदार व प्रतिनिधींनी एकत्र येत मोर्चा काढला. मैत्रेयच्या वर्षां सत्पाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन कारवाई झाली. परंतु, न्यायालयाच्या आदेशानुसार एस्क्रो खात्यावरील रक्कम आणि दिला गेलेला परतावा अतिशय नगण्य आहे. गुंतवणूकदारांच्या आक्रोशाचे प्रतिबिंब मोर्चात उमटले.  हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून भर पावसात मोर्चेकऱ्यांनी मैत्रेय, मैत्री सुवर्णसिद्धी, मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स कंपनीच्या संचालकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, पैसा कष्टाचा आहे म्हणून संघर्ष आहे..’ अशा घोषणा देत मागण्यांचे फलक हाती घेऊन मोर्चेकरी मार्गस्थ झाले.

रस्त्यात पावसाला सुरुवात झाल्यावर मोर्चाचे स्वरूप एकदम बदलले. छत्र्या व रेनकोटच्या सहाय्याने घोषणाबाजी करत मोर्चेकरी मार्गस्थ झाले. वृद्धांनीही थरथरत्या पावलांनी मोर्चात हजेरी लावत आपली जमा पुंजी लवकर देण्याची मागणी करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

मोर्चा व मोर्चाचा मार्ग पूर्वनियोजित असूनही वाहतूक विभागाने नियोजन केले नाही. परिणामी, तासभर उशिराने सुरू झालेला मोर्चाची वेळ आणि शाळा भरणे व सुटण्याची वेळ एकच झाली. मोर्चा मार्गावर शाळेत ये-जा करणारी मुले व वाहनधारकही अडकले. मुलांना उशीर झाल्याने पालकांनी वाहनचालकांना दूरध्वनी करण्याचा सपाटा लावला तर दुसरीकडे उशीर होईल म्हणून शालिमारपासूनच मुलांनी आपले वाहन सोडत शाळेत पायी जाणे पसंत केले.

शेकडो वाहने रस्त्यात अडकून पडली. काहींनी वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न केला असता मोर्चेकऱ्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.

पोलिसांची अशीही कर्तव्यदक्षता

मोर्चा व पाऊस यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने शालिमार परिसरात खासगी वाहने, रिक्षा अडकून पडल्या. बंदोबस्तात असलेल्या काही वाहतूक पोलिसांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षाचालकांकडे कागदपत्र, परवाना आदींची मागणी केली. काहींनी कागदपत्रे दाखवत सुटका करून घेतली तर काहींचा परवाना पोलिसांनी ताब्यात घेतला. अन्य कागदपत्रे कार्यालयात येऊन दाखविण्याची सूचना केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे निवेदन

मैत्रेय व मैत्रमध्ये अनेक ग्राहकांनी पैसे गुंतवले असून कंपनीने दिलेले परताव्याचे धनादेश न वटता परत आले. या प्रकाराला दीड वर्षांचा कालावधी लोटूनही ग्राहकांच्या पदरी काहीच पडले नाही. फसविल्या गेलेल्यांमध्ये ६० टक्के ग्राहक व प्रतिनिधी या महिला आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला. ग्राहकांना त्यांचा परतावा वेळेत मिळावा अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संदर्भात कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी दिला.