एक नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या येथील मालेगाव र्मचटस् सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या मुदतीसाठी अद्याप चार दिवसांचा अवधी शिल्लक असतांना सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही पॅनलने तत्पूर्वीच जोरदार प्रचार सुरू केला आहे. सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही आणि पक्षपातीपणा यामुळे बँकेची प्रगती कुंठित झाल्याचा आरोप विरोधक करीत आहेत तर विरोधकांचा हा आरोप व्यक्तिद्वेष आणि आपमतलबीपणाच्या भावनेतून असल्याची टीका सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी केली आहे. उभयपक्षी होत असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूक प्रचाराचा चांगलाच धूराळा उडाल्याचे दिसून येत आहे.
बँक संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी ९९ जण सध्य:स्थितीत रिंगणात आहेत. येत्या २३ ऑक्टोबर रोजी माघारीच्या मुदतीनंतर यासंदर्भातील खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी माघारीनंतर प्रचारासाठी केवळ सहा दिवसांचा अवधी मिळणार असल्याने दोन्ही प्रमुख पॅनलने उमेदवारांची घोषणा करत माघारीपूर्वीच धडाक्यात प्रचार सुरू केला आहे. सत्ताधारी गटाचे नेते हरिलालशेठ अस्मर, राजेंद्र भोसले आदी नेत्यांना दूषणे देत बँकेच्या पाच विद्यमान संचालकांनी यावेळी विरोधाचा सूर लावत प्रबळ विरोधी पॅनल निर्मितीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे ‘सहकार’ आणि विरोधकांचे ‘आपलं’ पॅनल यामध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही प्रमुख पॅनलच्या नेत्यांद्वारे परस्परांवर टिकेची झोड उठविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून बँकेत सत्तेचे केंद्रीकरण झाले असून सभासदांच्या मतांना किंमत उरली नाही,नियोजनशुन्य कारभारामुळे बँकेच्या विकासाली खीळ बसली आहे,मर्जीतल्या कर्जदारांना अवाजवी सूट दिली जाते अशा स्वरूपाचे आरोप करत बँकेचा असाच कारभार सुरू राहिला तर भविष्यात तिचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीतीव्यक्त करत विरोधक सत्ताधाऱ्यांना ‘लक्ष्य’ करीत आहेत. सत्ताधारी गटाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सत्तालालसेतून विरोधक हे आरोप करीत सुटले असून त्यातून ते कुणाचे हित साधणार आहेत असा सवाल हा गट करीत आहेत. विरोधात गेलेल्या पाच संचालकांपैकी तीन जणांनी यापूर्वी बँकेच्या अध्यक्षपदाची धूरा सांभाळली आहे, हे विसरता येणार नाही असे नमूद करून बँकेत जर हुकूमशाही पद्धतीचा कारभार होता तर आता गरळ ओकणारे तेव्हा मूग गिळून का बसले, असा सवाल या पॅनलचे नेते हरिलालशेठ अस्मर यांनी उपस्थित केला आहे. तसेच सहकार क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी असलेल्या संस्थेची विरोधक राजकारणासाठी बदनामी करत असल्याची टीका विद्यमान अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी केली आहे.