नाशिक महापालिकेतील अधिकारी मृत्यूप्रकरण

विविध कर विभागातील सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील तणावाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जात आहे. पालिकेत सत्ताधारी भाजप आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात सहा महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. मुंढे आल्यापासून अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढल्याचा दावा केला जात असतांना वेगवेगळ्या कारणांमुळे आयुक्तांना हटविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या घटनेनंतर अकस्मात मौन बाळगले आहे.

महापालिकेची सूत्रे स्वीकारल्यापासून मुंढे आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरून रणकंदन सुरू आहे.  भाजपने मंजूर केलेली अडीचशे कोटींची रस्त्यांची कामे रद्द करणे असो की, पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करवाढीचा घेतलेला निर्णय असो, असे अनेक मुद्दे उभयतांमध्ये संघर्षांचा नवीन अध्याय लिहिणारे ठरले. आयुक्तांच्या कठोर आर्थिक शिस्तीमुळे भाजपच्या मनमानी कारभाराला चाप लागला. सहा महिन्यात सर्व कामांच्या निविदा प्राकलनापेक्षा कमी दराने दिल्याने पालिकेची कोटय़वधींची बचत झाली, परंतु इतरांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थेचे पडसाद काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उमटले होते. मध्यंतरी भाजपने करवाढीच्या निर्णयावरून आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याची केलेली तयारी वरिष्ठांनी दाद न दिल्याने बारगळली होती. आयुक्तांना शह देताना भाजपने विरोधकांनाही आपलेसे केले.

या घडामोडी घडत असताना गुरूवारी एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असल्याने कोणतीही माहिती देण्यात आली नसतांना अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील कामाच्या ताणतणावाचा मुद्दा चर्चेत आला.  हा ताण कमी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी सेनेने दिला आहे. या संदर्भात महापौर रंजना भानसी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मतप्रदर्शित करण्यास नकार दिला.

दिवंगत धारणकर यांनी मागील गत पाच महिन्यात ४२ दिवस वेगवेगळ्या कारणास्तव रजा घेतली होती. त्यात अमरनाथ यात्रेच्या सुटीचाही अंतर्भाव आहे. त्यांची बदली केली गेली नव्हती. उलट त्यांना इतरांपेक्षा अधिक रजा दिल्या गेल्या.

दीर्घ सुटीवर असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडण्याचा प्रश्नच नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आयुक्त मुंढे यांनी कार्यान्वित केलेली ऑनलाईन तक्रार निवारण कार्यप्रणाली आणि भ्रमणध्वनी अ‍ॅप प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारी सोडविता येऊ लागल्या. पाच महिन्यात त्या अंतर्गत प्राप्त झालेल्या १६ हजार ७५५ पैकी १६ हजार १०२ तक्रारींचे निवारण करण्यात आले. तक्रारींच्या सोडवणुकीचे प्रमाण ९६ टक्क्य़ांहून अधिक आहे. या प्रणालीने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर मुदतीत काम करण्याचे दायित्व आले. दुसरीकडे या प्रणालीमुळे नगरसेवकांकडे तक्रारी घेऊन जाण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळेही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे.

नागरिकांना सुलभ सेवा मिळावी म्हणून महापालिकेतील उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन आणि विभागणी करण्यात आली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामातील दर्जा उंचाविण्यासाठी यशदा संस्थेमार्फत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात तणावमुक्त काम या विषयाचाही अंतर्भाव आहे. हे प्रशिक्षण आणि नियोजनामुळे प्रशासनातील कामकाजाच्या पध्दतीत सुधारणा होत आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेत होत आहे. त्यामुळे कोणावर ताण येण्याचे कारण नाही.  – तुकाराम मुंढे आयुक्त, महापालिका