News Flash

नाशिकमध्ये ‘मराठी भाषा दिन’ साजरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजगड कार्यालय येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

मराठी भाषा दिनानिमित्त नाशिक येथील अभिनव बालविकास मंदिरतर्फे काढण्यात आलेली दिंडी

दिडी, मैफल, व्याख्यानांसह अनेक उपक्रमांचे आयोजन

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मंगळवारी शहर परिसरात दिंडी, काव्यमैफल, सामूहिक वाचन यांसह इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक विश्वात तर चिमुकल्यांनी संत, साहित्यिक यांच्यासह पारंपरिक वेशभूषा परिधान करत मराठीचा टिळा कपाळी लावला. राजकीय पक्ष कार्यालयातही मराठी दिन उत्साहात साजरा झाला.

येथील कुसुमाग्रज स्मारक परिसरात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. यानंतर महापौर रंजना भानसी, महापालिकेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मरण यात्रेत पहिले पुष्प  किशोर पाठक यांच्या संकल्पनेवर कविश्रेष्ठ ‘कुसुमाग्रजांच्या कवितांचा आविष्कार-सुवर्ण किरणावली’ ने गुंफले गेले. कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांना छंदबध्द करत मकरंद हिंगणे यांनी संगीत दिले. कुसुमाग्रजांच्या कवितांचे यावेळी वाचन तसेच गायन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजगड कार्यालय येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जयकुमार तीब्रेवाला इंग्लिश मीडियम शाळेत वक्तृत्व, कविता स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख लता पवार उपस्थित होत्या. शहर परिसरातील काही विद्यालयांमधून मराठी दिनानिमित्त मराठी साहित्य संपदा असलेली ग्रंथदिंडी परिसरातून काढण्यात आली. दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी संत, साहित्यिक तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करत ‘मराठी असे आमुची’ असा जयघोष करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. बालक मंदिर विद्यालयात पाचवी ते सातवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता संकलित करत तयार केलेल्या ‘काव्यसुधा’ काव्य संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक शाखेचे उन्मेष गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कवितांसह अन्य कवींच्या कवितांचे विद्यार्थ्यांनी गायन केले. गायधनी यांनी स्पर्धेच्या जगात मराठी कोठेही कमी नाही हे चिमुकल्यांनी आपल्या काव्यसंपदेतुन सिध्द केले असल्याचे सांगितले.

सर डॉ. मो. स. गोसावी वाणिज्य महाविद्यालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे प्राचार्य डॉ. मनिषा राणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मराठी भाषा दिनाविषयी प्राचार्या राणे यांनी मार्गदर्शन केले. नवमाध्यमांमुळे आजची पिढी भाषेची लक्तरे वेशीवर टांगत आहे. एखाद्या ठरावीक दिवशी मराठी भाषेचा गोडवा गाण्यापेक्षा दैनंदिन वापरात तिचा वापर होणे गरजेचे आहे. ग्रामीण, दलित, स्त्रीवादी अशा अनेक साहित्य प्रवाहात लेखन करणाऱ्या त्या त्या साहित्यिकांची पुस्तके वाचा. लेखन, वाचन आणि मनन यावर भर दिला तर मराठी किती समृद्ध आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. मराठीया प्राध्यापिका सायली आचार्य यांनीही नव माध्यमांमुळे आपण संदेश देवाणघेवाणच्या बाबतीत शब्दांना पर्याय शोधत आहोत, त्यामुळे आपलीच मराठी संकुचित होत असल्याची खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनीही यावेळी विचार मांडले. एस.एम.आर.के महिला महाविद्यालयात कुसुमाग्रजांच्या साहित्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी मराठी साहित्याचा समृद्ध वारसा जतन करण्याचे आवाहन केले. मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व स्पष्ट करतांना त्यांनी इंग्रजीचे ज्ञान प्राप्त करतांना आपल्याला मराठी भाषेचा विसर पडायला नको, असे सांगितले. मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज तसेच अन्य साहित्यिकांच्या विविध कथा, काव्य संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात आले. अर्पणा कुलकर्णी, सृष्टी जोशी यांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ानिमित्त घेतलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात आले. नवमाध्यमांचे नावे ओरड होत असतांना व्हॉट्स अप आणि फेसबुकवर मराठी दिनाच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण दिवसभर सुरू राहिली. मला आवडलेले पुस्तक, आवडते साहित्यिक अशा विषयांवर अनेकांनी आपली मते मांडली.

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांंनी सलग तीन तास वाचन केले. नव माध्यमांच्या दुनियेत हरविलेल्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचनालयाच्या वतीने छत्रे न्यु इंग्लिश स्कूल आणि मरेमा विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना सोबत घेत आवडीची पुस्तके वाचण्यासाठी सामूहिक वाचनाचा उपक्रम घेतला. यावेळी इंडियन हायस्कूलची नुपूर आहेर, छत्रे न्यू इंग्लिश स्कूलची संजीवनी मोरे यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यRमास प्रमुख म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष प्रदिप गुजराथी, सुरेश शिंदे, संचालक नरेश गुजराथी, उपस्थित होते. प्रदीप गुजराथी यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगितले. नरेश गुजराथी यांनी  वाचनाचे महत्त्व सांगून कवी कुसूमाग्रज यांच्या मनमाड शहराशी असणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. हर्षद गद्रे, वृंदा पाठक यांनीही मार्गदर्शन केले. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने कवी कुसुमाग्रज व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकांचे प्रदर्शन वाचकांकरिता भरविण्यात आले होते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 3:45 am

Web Title: marathi language day celebrated in nashik 2
Next Stories
1 सिडकोत अतिक्रमण निर्मूलनात दुजाभाव
2 खासगी रुग्णालय कायद्यात रुग्णहिताच्या तरतुदींवरच गदा
3 फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या झळा
Just Now!
X