कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांनी थैमान घातले असताना या मुद्दय़ावरून राजकारणही तापले आहे. शिवसेनेने खोचक शब्दात महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनावर ताशेरे ओढल्यानंतर आता मनसेलाही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आले आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी आठ दिवसांत उचित कार्यवाही न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरात मोठय़ा प्रमाणात संसर्गजन्य आजार पसरल्याने नाशिककर भयभीत झाले असून या स्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना होत नसल्याचा परिणाम विद्यार्थ्यांसह नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होत असून त्यात काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शासकीय, खासगी रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरली आहेत. रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णांवर योग्य उपचार, जनजागृती होण्याची आवश्यकता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

दरम्यान, महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन नागरिकांच्या जिवाशी आलेल्या या समस्येत उपाययोजना करण्याऐवजी वेगळ्याच कामात मग्न असल्याचे दिसून येत असल्याची टीकाही विरोधकांकडून होऊ लागली आहे. नाशिककरांचे प्राण वाचविण्यास इतर कोणत्याही कामापेक्षा अधिक महत्त्व देण्याची गरज मांडण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जावी

रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढल्याने खाटांची संख्या वाढवावी, याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, डेंग्यू, स्वाइन फ्लू आदी संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित शाळा-महाविद्यालयांमध्ये उपाय योजून जनजागृती करावी, अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, राहुल ढिकले, अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन पदाधिकाऱ्यांनी महापौरांसह अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गुंजाळ, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आनंद पवार यांना दिले.