नाशिक : वर्षभरापासून आरोग्य यंत्रणा करोनाशी लढा देण्यात गुंतलेली असताना अन्य आरोग्यविषयक प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. वर्षभरात ९० हून अधिक गरोदर मातांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. यातील पाच माता या करोना संसर्गाला बळी पडल्या आहेत.

मागील वर्षी मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असतांना जिल्हा परिसरातील अनेक रुग्णालये ही करोना उपचार केंद्र तसेच करोना रुग्णालयांमध्ये परिवर्तित झाली. करोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने करोनाग्रस्त गरोदर मातांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन के ला. सर्वसाधारण गरोदर मातांच्या प्रसुतीसाठी जुन्या इमारतीतील प्रसूती कक्षात व्यवस्था करण्यात आली. ग्रामीण भागात करोना रुग्णालये झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात ही व्यवस्था करण्यात आली. या काळात गरोदर मातांचे लसीकरण, आवश्यक चाचण्यांकडेही लक्ष देण्यात आले.

परंतु, या काळात वाहतुकीवर निर्बंध असल्याने तसेच घराबाहेर पडण्यात अडचणी आल्यामुळे गरोदर मातांच्या बाबतीत काही ठिकाणी गुंतागुंत निर्माण झाली. या काळात ९३ गरोदर मातांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक ग्रामीणमधील ४३, नाशिक महापालिका हद्दीतील १७, मालेगाव महापालिका हद्दीतील १७, तसेच ठाणे, धुळे, नंदुरबार, पालघर, अहमदनगर, मुंबई येथील १६ गरोदर मातांचा समावेश आहे. यातील पाच मातांचा मृत्यू करोनामुळे झाला.

गेल्या वर्षभरातील ही आकडेवारी असून यामध्ये प्रसूतिपूर्व तसेच प्रसूतिपश्चात काळात झालेल्या रक्तस्त्रावामुळे ६४, संसर्गजन्य आजाराने पाच, रक्ताक्षयाने पाच, हृदयरोगाने दोन, अपघात तसेच अनुवंशिक आजारामुळे १७ गरोदर मातांचा मृत्यू झाला.  वर्षभरात नाशिक महापालिका हद्दीत तीन, मालेगाव हद्दीत एक आणि नंदुरबार येथील एक गरोदर माता अशा पाच मातांचा मृत्यू झाला.