महापालिकेच्या बोटचेप्या भूमिकेचा नागरिकांना त्रास, जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही नाही    

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापारी संघटनांनी मध्यवर्ती बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्यानंतर त्याचा परिघ मंगळवारी पंचवटी आणि नाशिकरोडपर्यंत विस्तारला आहे. या भागात बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारपासून सिडकोतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याचे निश्चित केले आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने तीन दिवसांपासून बंद असून अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करणे अवघड झाले. पण महापालिकेने राजकीय दबावापोटी कारवाईबाबत बोटचेपी भूमिका घेतल्याची नागरिकांची तक्रार आहे.

टाळेबंदीत व्यापारी व्यवहार सुरळीत करण्यासाठी आग्रही होते. दुकाने उघडण्यास परवानगी देतांना नियमावली आखून दिली गेली. तिचे पालन योग्य प्रकारे झाले नाही. शहरात करोनाचा आलेख वेगाने विस्तारत आहे. दररोज १०० च्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. मध्यवर्ती बाजारपेठेत काम करणारे काही कर्मचारी बाधित आढळल्यानंतर व्यापारी वर्ग खडबडून जागा झाला. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. राजकीय दबावापोटी विविध व्यापारी संघटनांचा नाईलाज झाला. मुळात टाळेबंदीत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरळीतपणे सुरू होती. आवश्यक ती सावधगिरी बाळगून व्यवहार केले जात होते. र्निबध शिथील झाल्यानंतर हे सर्व नियोजन कोलमडले.

मध्यवर्ती बाजारपेठेप्रमाणे आता पंचवटीत व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून दुकाने बंद केली असून नाशिकरोडमध्येही चार दिवस बंद पाळला जाणार आहे. उपरोक्त दोन्ही भागात औषध दुकान वगळता मुख्य बाजारपेठ, रस्त्यांवरील बहुतांश दुकाने बंद राहिली. अंतर्गत कॉलनी रस्त्यावरील काही दुकाने सुरू होती. दुकाने बंद होऊनही परिसरातील वर्दळ कमी झालेली नव्हती. रविवार कारंजा, पंचवटी, नाशिकरोड भागातील बरिचशी किराणा दुकानेही बंद आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसला. नाशिकसह मुंबई आणि परिसराची भाजीपाल्याची भिस्त असणाऱ्या पंचवटीतील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. बाजार समितीतील गर्दीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्षेप नोंदविले होते. करोनाविषयी हमाल, कामगार ते व्यापारी अशा सर्व घटकांची जनजागृती करण्याची मागणी करण्यात आली. बाजार समितीत गर्दी होणार नाही, नियमित स्वच्छता राखली जाईल, यासाठी समितीला दक्षता घेण्याची सूचनाही आधीच करण्यात आली आहे.

पालिकेची भूमिका संशयास्पद

बंदमध्ये रविवार कारंजासह पंचवटी आणि नाशिकरोड भागातील घाऊक, किरकोळ किराणा मालाचे दुकानदारही सहभागी झाले आहेत. परिणामी, नागरिकांना दैनंदिन चीजवस्तू खरेदी करणेही अवघड झाले. जिवनावश्यक वस्तुंची दुकाने बंद ठेवल्यास महापालिकेने कारवाईचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कारवाईचे धाडस दाखविता आले नाही. महापालिकेच्या बोटचेपी भूमिकेचा फटका नागरिकांना बसत आहे. राजकीय दबावापोटी प्रशासन कारवाईला कचरत असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.