सर्वसामान्य बालकांपेक्षा दिव्यांग, दृष्टिबाधित बालकांच्या भौतिक गरजा वेगळ्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात तसेच शैक्षणिक कारकीर्दीत या भौतिक साधनांमुळे आमूलाग्र बदल घडतो. या भौतिक साधनांची उपयुक्तता आणि तोंडओळख सर्वसामान्यांना व्हावी यासाठी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेच्या वतीने खास संग्रहालय नाशिक येथील मुख्यालयात उभारण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कामाची सुरुवात झाली असून सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीत हे संग्रहालय नाशिककरांसाठी खुले होईल.

नॅब संस्था दोन तपांहून अधिक काळापासून दृष्टिबाधित, अस्थिव्यंग, बहुविकलांग तसेच मूकबधिर यांच्या प्रश्नांवर काम करत आहे. संबंधितांना शैक्षणिक क्षेत्रात वावरताना येणाऱ्या अडचणी, त्यांच्यासाठी विशेष अभ्यासक्रमाची रचना, त्यासाठी उपयुक्त साधनसामग्रीची जमवाजमव, त्यांच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. या कामात समाजातील काही दानशूर व्यक्ती व संस्था मदत करतात. ही मदत बाक, कपाटे, ध्वनिमुद्रिका यासह अन्य काही साहित्यांपुरती मर्यादित आहे. ही बालके व व्यक्तींना नेमक्या कोणत्या साधनांची आवश्यकता आहे, त्या साधनांची उपयुक्तता काय याविषयी सर्व अनभिज्ञ आहेत. या पाश्र्वभूमीवर, या बालकांना शिक्षण देणाऱ्या संस्था, त्यांचे शिक्षक यासह सर्वसामान्यांना याविषयी माहिती व्हावी यासाठी नॅबने वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दृष्टिबाधित, अस्थिव्यंग, बहुविकलांग तसेच मूकबधिर बालके व व्यक्तींचा विचार करण्यात आला आहे. यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यालयातील काही खोल्या संग्रहालयासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळाली असून त्यासाठी संस्था पातळीवर निधी उभारण्यात येणार आहे. तसेच आवश्यक साधनसामग्रीबाबत त्या त्या कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. काही साहित्य मागवण्यास सुरुवात झाली आहे.

दृष्टिबाधितांसाठी शैक्षणिक साहित्य, त्यांचा बाहेरील वावर सहज व्हावा, व्यावहारिक संकल्पना समजाव्यात तसेच स्वयंपाकघर, सिग्नेचर इक्विपमेंट आदी गरजांचा विचार करत यादी तयार करण्यात आली असल्याचे महानॅब ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य धीरज इंगोले यांनी सांगितले. लिखाणाचे साहित्य, ब्रेल पेपर, मोबॅलिटी अ‍ॅड्स, दृष्टी अधू असणाऱ्यांसाठी, शैक्षणिक साहित्य त्यात गणित, विज्ञान, भूगोल, व्यवहारज्ञान यातील संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, क्रीडा, मनोरंजनात्मक खेळ, सुईमध्ये दोरा कसा घालावा यासाठी खास यंत्र अशा विविध गरजा लक्षात घेऊन संग्रहालय आकार घेणार आहे. डिसेंबर महिन्यात किंवा लुई ब्रेल यांच्या जन्मदिनी हे संग्रहालय नाशिककरांसाठी खुले होईल.

दिव्यांगांच्या गरजांचा विचार

दिव्यांगांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यांना शिक्षण घेताना अनंत अडचणी येतात. त्या काही साधनसामग्रीमुळे सोप्या होऊ शकतात. मात्र ते साहित्य आणि उपयुक्तता त्याविषयी सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही. त्याचा वापर कसा होतो, त्याची गरज यावर प्रकाश टाकण्यास हे संग्रहालय महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. राज्याच्या मुख्य कार्यालयात ही संकल्पना प्रथमच राबवली जात आहे. निधी जसा उपलब्ध होईल तसा इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात येईल.

– मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (मानद महासचिव, नॅब)