चित्रपट किंवा नाटकात कलाकृती साकारताना कलाकार दु:ख उधार घेतो. रोजच्या विविध भूमिकांमुळे वैयक्तिक जीवन आणि भूमिकेतील दु:खाची सरमिसळ होऊन गोंधळ निर्माण होतो. या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी कलाकारास वेगळा विरंगुळा शोधावा लागतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. कुसुमाग्रजांनी एका कलाकाराच्या आयुष्याची शोकांतिका दर्शविणारा अजरामर नायक रंगभूमीवर आणला. ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यावर फुंकर घालत या भूमिकेला न्याय देताना आपण रिते झालो, अशी भावनाही पाटेकर यांनी व्यक्त केली.
येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘कुसुमाग्रज स्मरण’ कार्यक्रमातंर्गत आयोजित ‘नटसम्राट-नाटक ते सिनेमा’ या विषयावरील चर्चासत्रात साहित्यिक, नाटककार, संगीतकार, नाटक, चित्रपट समीक्षक आदींच्या प्रश्नांना पाटेकर यांनी उत्तरे दिली. आपली दैनंदिन कामाची वेळ निश्चित आहे. रात्री नऊनंतर आपण काम करत नाही. परंतु, नटसम्राट करताना १२ ते १५ तासापर्यंत काम करून केवळ ३६ दिवसांत चित्रिकरण पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. नटसम्राट नाटकातील गणपतराव बेलवलकर यांच्या आयुष्यातील काही प्रसंग चित्रपटात काल्पनिकपणे मांडल्यामुळे नायकाच्या प्रतिमेचे अध:पतन झाल्याचा मुद्दा या वेळी उपस्थितांनी मांडला. त्यावेळी नानांनी नटाचे नट म्हणून आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे असल्याचे नमूद केले. चित्रपट आणि नाटक यातील अंतर लक्षात आणून देण्याासाठी काही बदल करणे आणि काही प्रसंग वाढविणे भाग पडते. त्यामुळे नायकाच्या भूमिकेला कोणत्याही प्रकारे हानी झाली नसल्याचा दावा पाटेकर यांनी केला. नटसम्राट चित्रपटातील मद्य प्राशनाच्या प्रसंगाचे त्यांनी समर्थन केले. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘मेकिंग ऑफ नटसम्राट’साठी सर्व पथकाने कौशल्य पणाला लावल्याने चित्रपट यशस्वी झाल्याचे सांगितले.