नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावर मंगळवारी एसटी बस आणि रिक्षाची धडक झाल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे. अपघातात जखमी झालेल्या ३४ प्रवाशांवर मालेगाव, देवळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अरूंद रस्त्यावर भरधाव बस विरुध्द मार्गिकेत शिरल्याने हा अपघात झाला. एसटी चालकाचा निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मंगळवारी दुपारी चार वाजता मेशी फाटय़ाजवळ झालेल्या विचित्र अपघातात मध्यरात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. बुधवारी सकाळी बचाव पथकाने पुन्हा शोध मोहीम हाती घेतली. अपघातात जुळ्या बाळांसह आई तर एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ महिला  आणि ११ पुरूष, तीन लहानग्यांचा समावेश आहे.

देवळा-मालेगाव रस्ता अरुंद आहे. चालक भरधाव बस चालवत होता. वेगात वळण घेतांना विरुध्द बाजूकडील मार्गिकेत बस शिरली आणि समोरून येणाऱ्या रिक्षाला धडकली. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती आणि घटनास्थळावरील स्थिती लक्षात घेता अपघातास बस चालकाचा निष्काळजीपणा, भरधाव वेग कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

अपघातातील मृतांची नावे- शिवाजी गावित (५२, नाळिद, कळवण), चंद्रभागाबाई उगले (५५, सटवाईवाडी, देवळा), कृष्णाजी निकम (५५, वखारवाडी, देवळा), अलका मोरे (४२, खर्डे, देवळा), कल्पना वनसे (३०) आणि रिध्दी-सिध्दी वनसे (दोन वर्षांची जुळी, निंबायती, मालेगाव), अंजना झाडे (४८, दोडी, सिन्नर), बाळासाहेब निकम (५५, शिरसमणी, कळवण), बसचालक प्रकाश बच्छाव (५५, भेंडी, कळवण), रघुनाथ मेतकर (८१, देवळा), शांताराम निकम (५३, गणेशनगर, कळवण), सरलाबाई आहेर (५२, जिरवाडे, मालेगाव), नंदाबाई पवार (५५, कनाशी, कळवण), शितल अहिरे (३१, चिराई, सटाणा), मीनाक्षी मुसळे (५५,धुळे), जनाबाई बेलदार (६५, येवला), अजिम मन्सुरी (५५), हाजराबी मन्सुरी (४०), कुर्बान मन्सुरी (५५, तिघेही येसगाव, मालेगाव), शाहिस्ता अन्सारी (३६, नांदगाव), शाइन मन्सुरी (३५, सटाणा), अन्सार मन्सुरी (५०) आणि फारूक मन्सुरी (६०, दोघेही करंजगव्हाण, मालेगाव), जय्यद पिंजारी (तीन, सटाणा), ज्ञानेश्वर सूर्यवंशी (२६, येसगाव, मालेगाव) यांचा  समावेश आहे.