30 September 2020

News Flash

उद्यानातील ‘लेझर’वरून वादंग

नेहरू वनौषधी उद्यानातील बंद पडलेल्या लेझर शोवरून मनसे-भाजपमध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.

 

मनसेची विकासकामे सत्ताधारी नष्ट करीत असल्याचा आरोप

महापालिकेतील सत्ताधारी भाजप शहरात मनसेने केलेली विकासकामे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असून ही कृती तालिबानी वृत्तीशी साधम्र्य साधणारी असल्याचे टीकास्त्र पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सोडले आहे. नेहरू वनौषधी उद्यानातील बंद पडलेल्या लेझर शोवरून मनसे-भाजपमध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.

मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून पांडवलेणीच्या पायथ्याशी नेहरू वनौषधी उद्यानात ‘लेझर शो’ची संकल्पना मांडण्यात आली होती. नावीन्यपूर्ण पद्धतीने साकारलेला देशातील हा एकमेव लेझर शो असल्याचे सांगितले जाते. टाटा फाऊंडेशनच्या निधीतून साकारलेल्या या संकल्पनेला उद्योगपती रतन टाटा, अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह अनेकांनी दाद दिली आहे. शहरवासीयांसह पर्यटक उद्यानातील लेझर शो पाहण्यास गर्दी करीत होते.

मनसेच्या सत्ताकाळात साकारलेला हा लेझर शो विजेच्या लपंडावामुळे काही दिवसांपूर्वी बंद झाला. विजेचा दाब कमी-अधिक होत असल्याने २५ दिवे जळाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असून तोपर्यंत शो बंद राहणार आहे. गंगापूर रोडवरील जेहान चौकासह शहरातील इतरही प्रमुख चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. त्यासाठी उपरोक्त चौकातील वाहतूक बेट हटविणे वा त्यांचा आकार कमी करणे क्रमप्राप्त ठरले आहे. या दोन्ही मुद्दय़ावरून मनसेने भाजपला कोंडीत पकडले आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील गौतम बुद्धांचे शिल्प उद्ध्वस्त केले. पण, त्यामुळे गौतम बुद्धांचे विचार नष्ट झाले नाही. कारण ते सर्वव्यापी आहेत. भाजप महापालिकेत सत्तेत आल्यानंतर त्याच पद्धतीने मनसेची विकासकामे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तोफ पक्षाचे प्रवक्ते अभ्यंकर यांनी डागली.

सत्ता हाती घेतल्यानंतर भाजपने लगेच शहरातील ११ वाहतूक बेट तोडण्याचा घाट घातला. नेहरू वनौषधी उद्यानातील लेझर शो बारा दिवसांपासून बंद आहे. असे असूनही प्रशासन ढिम्म आहे. या कृत्यातून मनसेने केलेली विकासकामे नाशिककरांच्या स्मृतीतून पुसली जातील, असा भाजपच्या मंडळींचा समज असेल तर तो भ्रम आहे. विजयाच्या धुंदीत भाजप नाशिकचा विकास नव्हे तर भकास करायला निघाले असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकाळात झालेली विकासकामे नष्ट करण्याचा भाजपने पाडलेला पायंडा दुर्दैवी असल्याचे अभ्यंकर यांनी म्हटले आहे.

मनसेने केलेले आरोप भाजपने फेटाळले आहेत. मनसेच्या कार्यकाळात शहरात लेझर शोसारखी चांगले कामे झाली, त्याला चांगलेच म्हणायला हवे. त्यात राजकारण आणण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असे भाजपने सूचित केले आहे.

मनसेचे आरोप तथ्यहीन

निवडणूक संपुष्टात आल्याने सर्वाच्या सोबतीने भाजप काम करीत आहे. त्यात पक्षीय राजकारणाचा संबंध नाही. बंद पडलेला लेझर शो लवकर सुरू व्हावा, याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. विकासकामे नष्ट करण्याचा मनसेचा आरोप तथ्यहीन आहे. शहरात आजवर झालेल्या विकासकामांमध्ये भर घालण्याचे काम भाजप करीत आहे. गंगापूर रस्त्यावर अपघात झाल्यामुळे स्थानिकांनी जनआंदोलन केले. जेहान चौकात सिग्नल बसविण्याची मागणी केली. अशा काही चौकात सिग्नल बसविण्याबाबत पोलीस यंत्रणेशी चर्चा झाल्यानंतर वाहतूक बेट हटविणे वा त्याचा आकार कमी करणे क्रमप्राप्त ठरले.

रंजना भानसी (महापौर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 12:44 am

Web Title: nashik botanical garden laser show issue mns bjp
Next Stories
1 दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार
2 कचऱ्याच्या वर्गीकरणात महापालिकेचा हलगर्जीपणा
3 जेव्हा पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन..
Just Now!
X