News Flash

मतदान सकाळी संथ, नंतर वेग..

महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी १४०७ केंद्रांवर मतदान घेण्यात आले.

मतदान सकाळी संथ, नंतर वेग..
नाशिक महापालिकेसाठी वयोवृद्ध मतदारांनी असा सहभाग नोंदविला.

 

मतदानासाठी चाललेली लगबग.. अनेक केंद्रांवर लागलेल्या रांगा.. मूळ मतदानाऐवजी भलत्याने केलेले बोगस मतदान.. यादीत नावे शोधण्यासाठी चाललेली धडपड..मतदान केंद्रालगत कोणाची वाहने येऊ  नये यासाठी घेतली जाणारी दक्षता.. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवून असणारे पोलीस.. भ्रमणध्वनी घेऊन केंद्रात आलेल्या प्रतिनिधींवर झालेली कारवाई.. अशा वातावरणात मंगळवारी दुपापर्यंत महापालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. सकाळी संथपणे चाललेल्या मतदानाने नंतर चांगला वेग पकडला. यामुळे पहिल्या दोन तासात ७.१५ टक्के झालेले मतदान दुपारी साडे तीनपर्यंत ४३.३३ टक्क्यांवर पोहोचले. मतदानाची वेळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना बहुतांश केंद्रांवर मतदारांची गर्दी होऊ लागल्याचे पाहावयास मिळाले.

महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी १४०७ केंद्रांवर मतदान घेण्यात आले.  कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ८२१ उमेदवार असून मतदारांची संख्या १० लाख ७३ हजार ४०७ आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग व विविध संस्था, संघटनांनी राबविलेल्या उपक्रमांचे फलीत या दिवशी पाहावयास मिळाले.

नागरिक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडले. नव मतदारांसोबत वृध्दमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक केंद्रांवर सकाळपासून मतदार येऊ लागले. आपणच पहिले मतदान करायचे या विचाराने अनेकांनी केंद्र गाठले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर काहींनी सेल्फी काढले. काहींचा बराचसा वेळ परिसरात आपले केंद्र शोधण्यात गेला. काहींना तर दोन-तीन केंद्रात शोधाशोध केल्यावर आपले नाव सापडले. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रत्येकाला चार उमेदवारांना मतदान करायचे होते. काही ठिकाणी त्यासाठी स्वतंत्र मतदान यंत्रांची गटनिहाय व्यवस्था केली गेली. परंतु, ज्या ठिकाणी उमेदवारांची संख्या कमी होती, तिथे एकाच केंद्रांवर दोन मतपत्रिका समाविष्ट करण्यात आल्या.

मतदान करताना अनेकांचा गोंधळ उडाला. केंद्र अधिकाऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करावे लागले. यामुळे मतदानास नेहमीच्या तुलनेत अधिक वेळ लागला. तरुणाईसोबत वयोवृद्ध व आजारी मंडळीही मतदानास आली. नातवाला घेऊन ८५ वर्षीय पांडुरंग आहेर हे पत्नी कुसुम (८१) मतदानासाठी आले. प्रत्येक निवडणुकीत आपण मतदान करत असल्याचे त्यांनी सांगितले. अर्धागवायुचा झटका आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला.

अशी अनेक उदाहरणे पाहावयास मिळाली. प्रारंभीच्या दोन तासात ७.१५ टक्क्यांवर असणारे मतदान पुढील दोन तासात १८.५० टक्क्यांवर गेले. दुपारी दीड वाजता ही टक्केवारी ३०.६३ तर साडेतीन वाजता ४३.३३ टक्के मतदान झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

वयोवृद्ध, व्यंग, अपघातग्रस्त नागरिकांसाठी वाहनसौख्यची व्यवस्था केली गेली. केंद्राबाहेर सर्वच उमेदवार आपल्या नातेवाईक, कार्यकर्त्यांसह मत देण्याची विनंती करत होते. पोलिसांनी त्यांना मज्जाव केला असता तरी काही कालावधीनंतर त्यांनी पुन्हा मतदारांना साद घालण्याचे काम सुरू ठेवले. काही ठिकाणी वाहन उभे करण्यावरून पोलीस-मतदारांचे शाब्दीक वाद झाले. मतदार यादीत नाव शोधण्यास धावपळ होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी केंद्राच्या बाहेर खास व्यवस्था केली होती. मतदार यादीतील गोंधळामुळे या ठिकाणी नाव शोधण्यासाठी मतदारांची एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. मतदारांना नावे सापडत नसल्याची भ्रांत असताना काही कार्यकर्ते ‘लॅपटॉप’वर ‘गेम’ खेळण्याचा आनंद घेत होते. यंदा नावे शोधताना अनेक उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केला तर काही ठिकाणी लॅपटॉप ऐवजी स्मार्टफोनवर ऑनलाइन नावे शोधून देण्याचे काम केले जात होते.

बोगस मतदानाच्या तक्रारी

निवडणुकीत काही प्रभागात बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी मूळ मतदारांनी केल्या. त्रिमूर्ती चौकात वास्तव्यास असणारे विजय जोशी अकरा वाजता मतदानासाठी केंद्रावर गेले असता तत्पुर्वी त्यांच्या नावावर मतदान झाल्याचे निदर्शनास आले. मतदान अधिकाऱ्यांकडे आपली कागदपत्रे सादर करत माझ्या आधी मतदान कोणी व कसे केले अशी विचारणा केली. या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार ‘चॅलेंज व्होटिंग’साठी मतपत्रिकेवर खुणा करत बंद लिफाफ्यात ती अधिकाऱ्याकडे दिल्याचे जोशी यांनी सांगितले. इतर ठिकाणी असे काही प्रकार घडले.

पोलिसांच्या सतर्कतेने गैरप्रकारांना आळा

मतदानावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र दिवसभर सुरू राहिले. सारडा सर्कल येथील उर्दु शाळेत मतपत्रिकांचा क्रम बदलल्याची तक्रार करत उमेदवाराचा प्रतिनिधी शेख रियाज अमिरने गोंधळ घातला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. काही प्रभागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मतदार चिठ्ठी देताना उमेदवाराचे नाव व पक्षचिन्ह झळकत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ही यंत्रे जप्त केली. उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून केंद्रात भ्रमणध्वनीचा मुक्तहस्ते वापर सुरू होता. या पद्धतीने भ्रमणध्वनी वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करून भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले. अंबड येथे आठ ते नऊ बनावट मतदारांची टेम्पोतून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. हा टेम्पो जनता विद्यालयाजवळ पकडण्यात आला. सर्वाना अंबड पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. मतदानाच्या काळात अकस्मात वाहनांची तपासणी मोहीम राबवून मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार होत आहे काय, याची छाननी करण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागात मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी वापरली जाणारी दोन लाख ४१ हजाराची रोकड जप्त करण्यात आल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. नाशिक महापालिकेसाठी वयोवृद्ध मतदारांनी असा सहभाग नोंदविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2017 4:04 am

Web Title: nashik elections 2017 polling booths in nashik tight security in nashik for polling
Next Stories
1 उत्साहाच्या भरात उमेदवारांची गुन्हेगारी कुंडली पाहण्याचा विसर
2 नाशिकमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून चिठ्ठ्या जप्त
3 पालिकेसाठी १४०७ केंद्रांवर आज मतदान
Just Now!
X