News Flash

युवतीला पळवून नेणाऱ्या जीपच्या धडकेत शालेय विद्यार्थी ठार

पोलिसांनी धाव घेऊन संशयितांना ताब्यात घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

अपघातग्रस्त जीप  (छाया - दीपक सूर्यवंशी)

 

  • सटाणा तालुक्यातील किकवारी-तळवाडे दिगर मार्गावरील घटना
  • संतप्त जमावाकडून संशयितांना मारहाण

महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून किकवारी-तळवाडे दिगर मार्गावर भरधाव निघालेल्या बोलेरो जीपची धडक बसल्याने झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थी ठार झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजता हा अपघात झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी चार संशयितांना तळवाडे ग्रामपंचायतीत आणून बेदम चोप दिला. त्यांची जीपही पेटवून दिली. पोलिसांनी धाव घेऊन संशयितांना ताब्यात घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात युवतीचे अपहरण आणि अपघात असे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची माहिती दिली. सकाळी तळवाडे येथील दोन युवती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात निघाल्या होत्या. या युवतींजवळ बोलेरो येऊन थांबली. गाडीतील संशयितांनी त्यांना आतमध्ये ओढले. त्या वेळी एका युवतीने संशयितांच्या तावडीतून सुटका करून घेत आरडाओरड केली. यामुळे आसपासचे शेतकरी धावून आले. पण तोपर्यंत बोलेरो जीप सुसाट निघून गेली होती. याच मार्गावर यज्ञेश रघुनाथ काकुळते (१५) हा झाडाखाली मित्राची वाट पाहत उभा होता. या भरधाव जीपची त्याला धडक बसली. त्यात यज्ञेशचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, जीप दोन वेळा उलटी होऊन एका घराच्या व्हरांडय़ात जाऊन कोसळली. दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती सर्वदूर पसरली. दोन्ही गावांतील मोठा जमाव जमला. त्यांनी जीपमधील संशयित विशाल नामदेव देवरे (निताणे), रवींद्र उत्तम अहिरे (चालक, निताणे), सतीश बाबुराव वाघ (किकवारी) आणि अनिल पुंजाराम वाघ (हल्ली रा. नाशिक, मूळ गाव टाकळी, मालेगाव) या चौघांना तळवाडे ग्रामपंचायत कार्यालयात आणले.

या ठिकाणी मिळेल त्या वस्तूने संबंधितांना मारहाण करण्यात आली. संशयितांच्या अंगावरील कपडे काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तळवाडे येथे धाव घेतली.

ग्रामपंचायत कार्यालय गाठून पोलिसांनी संशयितांना जमावाच्या तावडीतून ताब्यात घेतले. सर्वाना शांतता पाळण्याचे आवाहन केले. संशयितांना २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यात आणताना यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. काकुळते कुटुंबातील एकुलता एक मुलगा दगावल्याने कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

ग्रामस्थांनी अपघातग्रस्त जीप पेटवून दिली. ही जीप निताणे येथील एकाच्या नावावर असल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातात मयत झालेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक बशीर शेख परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. दरम्यान, अपघातात शाळकरी मुलगा दगावल्याने गावावर शोककळा पसरली. संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध युवतीचे अपहरण आणि अपघात असे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शेख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 2:00 am

Web Title: nashik kidnaping case
Next Stories
1 कायाकल्प अभियानात कळवण उपजिल्हा रुग्णालयाची सरशी
2 राजकारणाची ‘सावाना’स लागण
3 दिवाळीत बस प्रवास महाग ठरणार
Just Now!
X