ग्रामीण भागातील महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी कृषिकन्येची धडपड

नाशिक : टाळेबंदीमुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर टाळेबंदीमुळे विस्कटलेल्या संसाराची घडी सावरण्यासाठी देवळा तालुक्यातील युवती पुढे आली. महिलांना आत्मनिर्भर करताना त्यांना लघू उद्योगाबरोबरच माती परीक्षणाचे धडे देत उद्योग-व्यवसाय करण्यासाठी ही युवती प्रोत्साहित करत आहे.

कोकण कृषी विद्यापीठात कृषी विषयात विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचे चौथ्या वर्षांचे शिक्षण घेत असलेली सुजाता ही मूळची देवळा तालुक्यातील भऊर येथील प्रकाश पवार यांची मुलगी. करोनामुळे पहिल्या टप्प्यातच महाविद्यालय बंद झाल्याने ती गावाकडे परतली. करोनामुळे सक्तीने मिळालेल्या सुट्टीत आपल्या शिक्षणाचा उपयोग करत सुजाताने गावातील महिलांना गृहउद्योगाचे मोफत धडे देणे सुरू केले. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ती प्रयत्न करू लागली.

शिवाय शेतकऱ्यांनाही कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊ लागली. काका बाबा पवार यांच्या मदतीने सुजाता शेतीची वेगवेगळी तंत्रे, त्यातील प्रयोग यांची माहिती घेऊ लागली. ही माहिती प्रत्यक्षात कशी उपयोगात आणता येईल, यासाठी तिचा प्रयत्न सुरू झाला.

मुळात कृषी क्षेत्राची आवड असल्याने शेतीमाल, फळपिकांवर प्रक्रिया करत गृहउद्योगाचे बीज रोवण्यासाठी ती प्रयत्न करत आहे. गावातील काही महिलांना सोबत घेऊन त्यांना आंब्यापासून जाम, आंबापोळी, आमचूर, रस, लोणचे यांसारखे विविध पदार्थ तयार करणे, पनीर तयार करणे, ती शिकवत आहे. या गोष्टी दीर्घकाळ टिकणाऱ्या असल्याने यांचा फक्त घरगुतीपुरता मर्यादित उपयोग न करता विविध खाद्यपदार्थाची निर्मिती आणि विक्री याची शिकवण ती देत आहे. शिवाय या लघू उद्योगांमागील अर्थकारणही ती समजावून सांगत असल्याने महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी बळ मिळाले आहे. ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी धडपडणारी सुजाता सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय झाली आहे. सुजाताची शेती आणि मातीशी नाळ असल्याने माती परीक्षण का करावे, माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा, त्याचे फायदे काय, शेतात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, त्यामुळे होणारे फायदे याविषयी ती शेतकऱ्यांना माहिती देत आहे.

काही दिवसांपासून सुजाता आम्हाला दीर्घकाळ टिकणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थाविषयी माहिती देत असून ते तयार कसे करावेत, याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवीत आहे. या गोष्टीमुळे भविष्यात आम्ही शेतीसोबत जोडधंदा म्हणून काही पदार्थ तयार करून बाजारात त्यांची विक्री करू शकतो. छोटा-मोठा व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे राहू शकतो.

– सोनाली निकम (गृहिणी)

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव हा कृषी पदव्युत्तर शिक्षणाच्या चौथ्या वर्षांमध्ये सादर केला जातो. विद्यार्थ्यांना खेडय़ातील परिस्थिती समजावी, शेतातील कुटुंबीयांसमवेत त्यांनी काम करावे, त्यांच्या अडचणी ओळखाव्यात, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे त्यांच्याकडे हस्तांतरण करावे, रोजगार आणि कौशल्य सुनिश्चित करण्यासाठी उद्योजकता वाढवावी, हे या कार्यानुभवामागील प्रमुख उद्देश आहेत. करोनाचे निमित्त होऊन या गोष्टी कागदावरच राहू नयेत आणि आपल्या परिसरातील महिलांच्या हाताला भविष्यात रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मी हे मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे.

– सुजाता पवार