24 September 2020

News Flash

लक्षवेधी लढत : महापौरांसाठी अस्तित्वाची लढाई

या एकंदर स्थितीत दिग्गज उमेदवारांमधून कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

 

दामोदर मानकर यांच्या उमेदवारीने चुरस

शहराचे प्रथम नागरिक  तथा मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांना त्यांच्या प्रभाग ६ (ड) मध्ये अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारे दामोदर मानकर यांना उमेदवारी दिल्याने पालिका निवडणुकीतील चुरस वाढली आहे. मुर्तडक यांनी मनसेने पाच वर्षांत केलेला विकास आणि मानकर यांनी मनसेने गेल्या पाच वर्षांत केलेला भ्रमनिरास हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा तयार केला असून त्याच्या जोरावर मतदारांना समोरे जात आहेत. या एकंदर स्थितीत दिग्गज उमेदवारांमधून कोण बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्याआधी सत्ताधारी मनसेने शहरात विविध विकासकामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. त्यात आकर्षक वाहतूक बेट, उड्डाण पुलाखालील सुशोभीकरण, लेझर शोचा अंतर्भाव असणारे वनौषधी उद्यान, बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्रास्त्र संग्रहालय, होळकर पुलालगतचा रंगीत पडदा, संगीतमय कारंजा आदींचा अंतर्भाव आहे. मनसेच्या सत्ताकाळातील लोकार्पण झालेली ही कामे मुर्तडक महापौर असताना झाली. अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या पंडित नेहरू उद्यानास प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी भेट देऊन प्रशंसा केली. मनसेच्या काळात पारदर्शक कारभार करताना नवीन वर्तुळाकार मार्गिका, प्रमुख मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे झाल्याचा मुर्तडक यांचा दावा आहे. मनसेला गळती लागली असताना मुर्तडक यांनी पक्षाचा किल्ला लढविला.

प्रभाग पुनर्रचनेत महापौरांच्या प्रभागाची काही अंशी मोडतोड झाली. काही भाग नव्याने जोडला गेला. महापौरांसमोर भाजपने नव्याने जोडल्या गेलेल्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे अपक्ष नगरसेवक दामोदर मानकर यांना उमेदवारी देण्याची खेळी केली. भाजपने दोन वेळा नगरसेवक राहिलेले आणि साहित्य, अध्यात्म, चित्रपट अशा सर्व क्षेत्रात मुसाफिरी करणारे दामोदर मानकर यांना उमेदवारी देऊन प्रभाग क्रमांक ६ (ड) मधील लढत चुरशीची केली आहे.

या प्रभागाची रचना रामवाडीपासून ते मखमलाबाद व मळे परिसरापर्यंत विस्तारलेली आहे. हा विचार करून गावातील स्थानिकांना भाजप व सेनेने प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. पहिल्यांदा स्वीकृत आणि नंतर अपक्ष म्हणून निवडून आलेले मानकर हे छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त, नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेचे संचालकपद भूषविताना प्राथमिक शाळेसाठी मोफत जमीन, मंदिरांची उभारणी व जीर्णोद्धार, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चे व आंदोलन केल्याचे मानकर सांगतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित काव्य लेखन, आध्यात्मिक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. कधीकाळी मायको कारखान्यात कार्यरत असणारे मानकर यांनी स्त्री भ्रूणहत्येवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली. वेगवेगळ्या कारणांमुळे मुर्तडक विरुद्ध मानकर लढत लक्षवेधी ठरत आहे. शिवसेनेने दीपक पिंगळे यांना रिंगणात उतरविले, तर काँग्रेस आघाडीने येथे उमेदवार दिलेला नाही. मात्र, खरी लढत मुर्तडक आणि मानकर यांच्यातच होणार असून मुर्तडक महापौर असल्याने त्यांचे अस्तित्व पणाला लागणार आहे. या लढतीकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:40 am

Web Title: nashik mayor fighting election for survival
Next Stories
1 अपक्षांना शिटी, बॅट, कप-बशी..
2 शौचालय नसल्याने भाजप उमेदवार रिंगणाबाहेर
3 प्रमाण भाषेसह बोली भाषाही महत्त्वाची!
Just Now!
X