करोनावरील रक्तद्रव्य उपचारासाठी 

नाशिक : करोनाचा कहर वाढत असून रुग्णांवर उपचारासाठी महापालिका रक्तद्रव्य उपचार (प्लाझ्मा थेरपी) चा विचार करत असली तरी त्यासाठी खासगी रुग्णालयांच्या मदतीची अपेक्षा आहे. या व्यवस्थेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागते. एखाद्या रुग्णालयाने सहमती दर्शविल्यास त्या दिशेने पावले टाकता येतील, असे महापालिकेचे म्हणणे आहे. तथापि, खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या परिस्थितीत अशी व्यवस्था खासगी रुग्णालयांकडे गेल्यास सामान्यांना उपचार करणे जिकीरीचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

राज्यात करोनाच्या रुग्णांवर काही ठिकाणी रक्तद्रव्य उपचार केले जात असून त्याचा रुग्णांना फायदा होत आहे. करोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी रक्तद्रव्य दान करण्यासाठी पुढे येण्याची गरज असते. राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात रक्तद्रव्य उपचार सुविधा उभारण्यात आली आहे. नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसले तरी मविप्र शिक्षण संस्थेचे खासगी महाविद्यालय आहे. तिथे करोना चाचणीसाठी प्रयोगशाळाही उभारण्यात आली आहे. गंभीर रुग्णांना बरे करण्यात रक्तद्रव्य उपचार पध्दती उपयुक्त ठरल्याचे सांगितले जाते. या उपचाराचा महापालिका विचार करत आहे.  करोना नियंत्रण कक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला. परंतु, या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था लागते. एखाद्या खासगी रुग्णालयाने तशी तयारी दर्शविल्यास त्या दिशेने प्रयत्न करता येतील, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून सांगितले जाते. वाढत्या रुग्णांमुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू केले. तथापि, तिथे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. रक्तद्रव्य उपचार पध्दती खासगी रुग्णालयांच्या ताब्यात गेल्यास सामान्य रुग्णांना ते उपचार घेणे आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

नव्याने ४० रुग्णांची भर

शहरात करोनाचा कहर कायम असून मंगळवारी सायंकाळपर्यंत नव्या ४० रुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या २०८० वर पोहचली. एकाचा मृत्यू झाल्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०५ वर पोहचली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या २४० संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत ८५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले तर सध्या १०९४ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोना रुग्णांवर महापालिका प्रशासनाची उपचार करण्याची मानसिकताच नाही. आपल्याकडील रुग्ण खासगी रुग्णालयात पाठविण्याकडे ते धन्यता मानतात. महापालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये औषधांवर खर्च करते. संकट ही संधी आहे. महापालिका रक्तद्रव्य उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारू शकते. एरवी सर्वसाधारण सभा घेऊन कोटय़वधींच्या कामांना मंजुरी दिली जाते. संपूर्ण शहर बिकट स्थितीत असताना नागरिकांना खासगी रुग्णालयात ढकलणार का ? महापालिकेतील काही घटक खासगी रुग्णालयांसाठी दलाली करतात. उलट महापालिकेचे खासगी रुग्णालयांवर नियंत्रण असायला हवे. रुग्णालयाबाहेर उपचारासाठीच्या दराची माहिती फलकाद्वारे द्यायला हवी.

– अजय बोरस्ते (विरोधी पक्षनेते, महापालिका)