दुष्काळामुळे रामकुंडात उद्भवलेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी गोदावरीच्या पात्रात कूपनलिका खोदण्यासाठी भूगर्भतज्ज्ञांकडून सर्वेक्षण करून लवकरच हे काम पूर्णत्वास नेण्याची तयारी महापालिकेने केली आहे. या संकल्पनेला गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने विरोध दर्शविला असला तरी संबंधितांनी ज्या मुद्दय़ावरून आक्षेप घेतला, त्यातील सत्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून पडताळली जाईल. तसेच कूपनलिका खोदण्यासाठी आजवर कुठे भूसुरुंगाचे स्फोट घडविले गेलेले नाहीत. त्यामुळे कूपनलिका खोदताना तसे काहीच करावे लागणार नसताना केवळ खोडा घालण्याच्या दृष्टिकोनातून विरोध केला जात असल्याच्या निष्कर्षांप्रत पालिका आली आहे.
गंगापूर धरणाने तळ गाठल्याने कित्येक महिन्यांपासून नदीपात्रातून पाणी सोडणे बंद झाले आहे. यामुळे काही भाग वगळता गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. सध्या टँकरद्वारे पाणी रामकुंडात टाकले जात असले तरी ती तात्पुरती व्यवस्था आहे. महापालिकेने रामकुंड परिसरात कूपनलिका खोदून या ठिकाणी पाणी आणण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. नदी पात्रांतर्गत जागा शोधून ही कूपनलिका खोदण्यात येणार आहे; परंतु हा परिसर खडकाळ असल्याने भूसुरुंगाचे स्फोट घडवून ही प्रक्रिया पार पाडली जाईल अशी भीती गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने व्यक्त केली होती. तसेच याच परिसरात अहिल्यादेवी होळकर पूल आहे. कूपनलिकेसाठी खोदकाम करताना त्याचा पुलावर परिणाम होईल, अशी साशंकताही व्यक्त केली गेली. तथापि, समितीचा आक्षेप हास्यास्पद असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कूपनलिका खोदण्यासाठी जगात कुठेही भूसुरुंगाचे स्फोट घडविले गेल्याचे ऐकिवात नाहीत. कूपनलिका खोदण्याचे काम यंत्रामार्फत होते. या यंत्राच्या कामाचा पूल अथवा आसपासच्या परिसरावर काही परिणाम होऊ शकतो काय, याची छाननी पालिका तज्ज्ञांमार्फत करणार आहे. तसेच रामकुंडासभोवतालच्या कोणत्या भागात जमिनीखाली पाणी उपलब्ध होऊ शकते, त्याची चाचपणी भूगर्भ शास्त्रज्ञांकडून करवून घेतली जाईल.
रामकुंडाच्या मागील बाजूला असणाऱ्या बंधाऱ्यातील पाणी या ठिकाणी शुद्धीकरण करून आणण्याचा पर्याय समोर केला जातो; परंतु तो व्यवहार्य नाही. उपरोक्त बंधाऱ्यात साचलेले पाणी खराब झाले आहे. त्याचा रंग हिरवट झाला असून ते भाविकांना स्नान वा पूजाविधीसाठी देणे अयोग्य आहे. रामकुंडात पाणी आणण्यासाठी सध्या केवळ कूपनलिका हा कायमस्वरूपीचा पर्याय ठरू शकतो. या माध्यमातून भूगर्भातील शुद्ध पाणी रामकुंडात आणता येईल. त्या अनुषंगाने सर्व बाबींची पडताळणी प्रशासनाने सुरू केली आहे. या कामाची त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू असून लवकरच हे काम मार्गी लावले जाणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले.