गरोदर माता, लहान मुलांची नियमित तपासणी, नागरिकांशी थेट संवाद 

नाशिक : जिल्ह्य़ास करोनाचा विळखा पडत असतांना शहरातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरात करोनाग्रस्तांनी अर्धशतक गाठले असतांना वडाळा परिसर या दृष्टीने संवेदनशील ठरत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग वेगवेगळ्या माध्यमातून करोनाशी झुंज देण्यात सक्रिय असतांना त्यांना येथील आरोग्य यात्रा या सामाजिक संस्थेची मोलाची मदत मिळत आहे. संस्था करोनाचा धोका सर्वाधिक असलेल्या गरोदर माता, लहान बालकांवर लक्ष केंद्रित करत असून त्यांची नियमित तपासणी, आवश्यकता भासल्यास पुढील उपचार ही कामे करीत आहे.

करोनाविरूध्दच्या लढय़ात आरोग्य यात्रा फाउंडेशनने आपली जबाबदारी हळूहळू वाढवत नेली. संवेदनशील असलेल्या वडाळा गावात आरोग्य विषयक अडचणी, विशिष्ट विचारसरणीचा पगडा पाहता या लोकांशी थेट संवाद साधत त्यांचे करोनाशी संबंधित विषयांवर प्रबोधन करण्यात येत आहे. याशिवाय करोना संसर्ग सहज होऊ शकेल अशा लक्ष्य गटाचा बचाव करण्याकडे संस्थेचा कल आहे.

वडाळा गावात सलग तीसऱ्या दिवशी तपासणी सुरू असून गर्भवती मातांची, १० वर्षांखालील लहान मुलांची तपासणी करण्यात आली. वडाळा गावातील के. बी. एच. विद्यालयात या उपक्रमाची सुरूवात करून  ४२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात दोन गर्भवती आणि नऊ लहान मुलांचा समावेश होता. शासनाच्या आदेशानुसार गर्भवतीची करोना चाचणी करणे गरजेचे आहे. या निकषानुसार एका गर्भवतीला सूचना देऊन पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिकेस कळविण्यात आले. तसेच सायंकाळच्या सत्रात झोपडपट्टी वसाहतीतील नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात केली.

सोमवारी वडाळा नजीकच्या रूंगटा कॅस्टल वसाहतीतील ७० जणांची तपासणी करण्यात आली. त्यात १६ लहान मुलगे, एक गर्भवती आणि ५३ इतरांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी श्रीनिवास रूग्णालय आणि गणेश रूग्णालयाचा चमु उपस्थित होता. महिलांची तपासणी डॉ. जानकी माने, लहान मुलांची तपासणी डॉ.दीप्ती चौधरी, डॉ. नरसिंग माने, डॉ. ब्रिजभूषण महाजन यांनी केली. डॉ. माने यांनी उपस्थित सर्व वसाहतीतील नागरिकांना करोनाची लक्षणे आणि त्याला आपण कश्या पद्धतीने हरवू शकतो याबद्दलची माहिती दिली. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका, आशा सेविका यांचे सहकार्य मिळाले. महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.