जनक्षोभ थोपविण्याचा पोलिसांचा प्रयत्न; तणावपूर्ण शांतता

चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या त्र्यंबकेश्वरमधील तळेगावमध्ये जाण्यास राजकीय नेत्यांना मज्जाव करण्यात आला आहे. अहमदनगरच्या कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी महिनाभर राज्यातील राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. त्यामुळे यंत्रणेला तपास कामात अडचणींना तोंड द्यावे लागले. तसे या ठिकाणी होऊ नये म्हणून नाशिक पोलिसांनी राजकीय नेत्यांना तळेगावकडे जाऊ न देण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

तळेगाव अंजनेरी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे पडसाद रविवारी जिल्ह्य़ात ठिकठिकाणी उमटले. नाशिक-त्र्यंबकेश्वर, मुंबई-आग्रा महामार्गावर जमावाने ठिकठिकाणी आंदोलने करत रास्ता रोको, दगडफेक व जाळपोळ केली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकला धाव घेत पीडितेची भेट घेऊन जिल्ह्य़ात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्या वेळी घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याचे नमूद करत वैद्यकीय अहवालाचा संदर्भ देऊन त्यांनी पीडित बालिकेवर बलात्कार झाला नसून तसा प्रयत्न झाल्याचे सांगितले. त्यांच्या विधानाने ग्रामस्थ संतापले आणि त्यांनी पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.  या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास त्यांची माफी मागून महाजन यांनी या विषयावर पडदा टाकला. सोमवारी गृहराज्यमंत्री (शहरे) दीपक केसरकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देऊन पीडित बालिकेची भेट घेतली.

नाशिकमध्ये भ्रमणध्वनी, इंटरनेट सेवा बंद

अफवा रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्य़ातील भ्रमणध्वनीवरील इंटरनेट आणि एकत्रित स्वरूपात लघुसंदेश पाठविण्याची सेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदा या स्वरूपाचा निर्णय घेण्यात आला. शहर व ग्रामीण भागात उफाळून आलेला जनक्षोभ सोमवारी हळूहळू कमी होत असून भागात तणावपूर्ण शांतता आहे.  जाळपोळ व तोडफोडीत एसटी महामंडळाच्या १८ बसची तोडफोड झाली तर सात बसगाडय़ा जाळण्यात आल्या. त्यात महामंडळाचे सुमारे दोन कोटींहून अधिकचे नुकसान झाले.

 शांतता कायम राखा- केसरकर

नाशिक जिल्ह्य़ातील तळेगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आल्यानंतर, त्याची हिंसक प्रतिक्रिया उमटल्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे.  या पाश्र्वभूमीवर सर्वच समाज घटकांनी शांतता राखावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सरकारच्या वतीने केले आहे. पंधरा दिवसांच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे त्यांनी सांगितले. नाशिकची अत्याचाराची घटना निंदनीय आहे, त्यानंतर उमटलेल्या िहसक प्रतिक्रियाही चिंताजनक आहेत.या हिंसाचाराचीही चौकशी करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.