News Flash

..अखेर पोलीस सर्वशक्तिनिशी रस्त्यावर

तळेगावच्या घटनेनंतर रविवारी चिघळलेली परिस्थिती मंगळवारी आटोक्यात आली होती.

नाशिक जिल्हा रूग्णालयाबाहेर असलेल्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करताना आयुक्त रवींद्र सिंघल (छाया- मयूर बारगजे)

वातावरण निवळत असताना ऐन विजयादशमीच्या सायंकाळी दुचाकीवरून भ्रमंती करणाऱ्या टोळक्यांनी धुडगूस घातल्याने पुन्हा तणावपूर्ण बनलेल्या नाशिक शहर व ग्रामीण भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुधवारी मोठा पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरला. शहरात अनेक ठिकाणी संचलन करत चिथावणीखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे हत्यार उपसले. नाशिकरोडमधील भाजपवासी नगरसेवक पवन पवारसह त्याच्या समर्थकांना दंडुक्याचा प्रसाद दिला गेला. ज्या भागात दगडफेक वा तत्सम प्रकार घडत होते, त्या ठिकाणी यंत्रणेने कारवाईचे हत्यार उपसले. ग्रामीण भागात काही घटनांचा अपवाद वगळता शांतता प्रस्थापित होण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न कायम ठेवले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भ्रमणध्वनीवरील इंटरनेट आणि एकत्रित स्वरुपातील लघुसंदेश पाठविण्याची सेवा बंद ठेवण्याची मुदत १४ ऑक्टोबपर्यंत वाढविली आहे. दसऱ्याच्या दिवशी सुरू झालेली शहर व बाहेरगावी जाणारी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.

तळेगावच्या घटनेनंतर रविवारी चिघळलेली परिस्थिती मंगळवारी आटोक्यात आली होती. परंतु, रात्री घडलेल्या घटनाक्रमामुळे शहर व ग्रामीण भागात पुन्हा तणाव निर्माण झाला. वेगवेगळ्या भागात दगडफेक, वाहनांची जाळपोळ व तत्सम प्रकार घडत असल्याने पोलिसांची दमछाक होत आहे. त्यातच, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा सूर उमटू लागल्याने बुधवारी यंत्रणा सर्वशक्तिनिशी रस्त्यावर उतरली. अशोकस्तंभ, महात्मा गांधी रोड, नाशिकरोड अशा विविध भागात धडक कृती दल, पोलीस यांनी संचलन केले. या दिवशी काही भागात अधूनमधून वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडत होते. त्या त्या ठिकाणी धडकत पोलिसांनी समाजकंटकांवर कारवाई सुरू केली. त्यात नाशिकरोडमधील अनेक गुन्हे दाखल असणारा नगरसेवक पवन पवारही सापडला. जेलरोड परिसरात दुपारी संचलन सुरू होते. यावेळी संबंधिताकडून काही आक्षेपार्ह विधान केले गेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. यामुळे पोलिसांनी त्याला दंडुक्याचा प्रसाद दिला. त्याचा भाऊ विशाल पवार आणि समर्थकांनाही चोपण्यात आले. काही विशिष्ट घटकांच्या चिथावणीमुळे वातावरण बिघडत असल्याचे यंत्रणेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा घटकांविरुद्ध कारवाई करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.

नाशिकरोडमधील भीमनगर, देवळाली कॅम्प व भगूर परिसरात दगडफेकीच्या काही घटना घडल्या. पोलिसांनी तिथे धडकत समाजकंटकांवर कारवाई आरंभली. यामुळे बस वाहतूक बंद असली तरी इतर वाहतूक सुरळीत राहिली. अफवा रोखण्यासाठी पोलिसांनी भ्रमणध्वनीवरील इंटरनेट सेवा आणखी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  अफवा पसरून स्थिती नियंत्रणाबाहेर जाते. मद्यधुंद अवस्थेत होणाऱ्या अनुचित घटना रोखण्यासाठी तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे.

ग्रामीणमध्ये काही ठिकाणी परिस्थिती सुधारत असली तरी काही भागात नव्याने काही घटना घडत आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर या दिवशी तणावपूर्ण स्थिती कायम होती. नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी शहरातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या वाहनांची तोडफोड, जाळपोळ व दगडफेकीच्या घटनांप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. सुंदरबन कॉलनीतील पांडुरंग निवासात घुसून समाजकंटकांनी दगडफेक केली. चारचाकी व दुचाकीचे नुकसान केले.

या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. सातपूर येथील महादेववाडी भागात गाडीवरून वाद झाला. त्यात संशयितांच्या मारहाणीत काही जण जखमी झाले. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सकाळी चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. पाथर्डी फाटा परिसरात दोन गटात झालेल्या वादात एका युवकाची दुचाकी जाळण्यात आली. इंदिरानगर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. दरम्यान, नाशिकरोडच्या सैलानी बाबा स्टॉपजवळ ३०० हून अधिक लोकांनी एकत्र येत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधितावर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी शहरातील विविध फलक, पोस्टर्स तात्काळ काढण्याची सूचना महापालिकेला केली आहे.

पोलिसांना परिस्थिती हाताळण्यात अपयश

तळेगांव प्रकरण पोलिसांना सक्षमपणे हाताळता आले नाही. घटना शनिवारी घडली रविवापर्यंत पोलीस अनभिज्ञ राहिले याबद्दल आश्चर्य वाटते.गर्दी सहज आटोक्यात आणता आली असती. त्यामुळे जनक्षोभ उसळला नसता. तसेच अशा घटनांमुळे समाजात तणाव निर्माण झाला की, याचा फायदा काही घटक घेतात. समाजकंटकाला जात नसते. त्यांना विध्वंस करायला कारण लागत नाही. त्यामुळे यंत्रणेने वेळीच प्रभावी उपाययोजना केल्या असता, कठोर पावले उचलली असती तर उद्रेक रोखता आला असता.

-राधाकृष्ण विखे पाटील (विरोधी पक्षनेते)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2016 2:02 am

Web Title: nashik police patrolling on road to maintain peace in city
Next Stories
1 ..हे आधीच का झाले नाही
2 ..तरीही स्वबळावर निवडणुका लढण्याचे काँग्रेसचे मनसुबे
3 संवेदनशील विषयात राजकारण -खा. संभाजी राजे
Just Now!
X