चारचौघांसारखा संसार असावा.. हसतं-खेळतं घर असावं.. वेळ-प्रसंग पडलाच तर मदतीला धावून येणारे नातेवाईक, मित्रमंडळी असावी, ही सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र नंदुरबार येथील गणेश सावंत यांचे हे स्वप्न पत्नी आणि सासू यांच्या जाचामुळे भंगले. संबंधितांकडून सतत पैशांची मागणी आणि अवास्तव अपेक्षा यामुळे गणेशने आत्महत्येचा विचार करीत रेल्वे स्थानक गाठले. सुदैवाने नाशिक रोड पोलिसांच्या हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने हा अनर्थ टळला. संबंधितास समुपदेशन करून नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
नंदुरबार येथील कोरीट रोड परिसरात गणेश सावंत हे आपल्या कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास आहेत. काही वर्षांपूर्वी नाशिक येथील युवतीशी त्यांचा विवाह झाला. काही दिवस सुरळीत गेल्यानंतर पत्नी व सासू यांच्याकडून त्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली. वेगवेगळ्या माध्यमांतून अवास्तव अपेक्षा व्यक्त करणे, पैसे मागणे असे प्रकार संबंधितांकडून सुरू झाले. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद सुरू झाले. या सर्व प्रकाराला कंटाळून गणेशने सोमवारी सासुरवाडी गाठली. घरी काही वाद झाल्यानंतर तडक नाशिक रोड पोलीस ठाणे गाठत तेथील एका कर्मचाऱ्याच्या हातात आत्महत्या करीत असल्याचे पत्र देऊन पळ काढला. नाशिक रोड रेल्वे स्थानकात रेल्वेची वाट पाहत तो तिथेच थांबला. पोलिसांना दिलेल्या पत्रात त्याने पत्नी व सासूला वैतागून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूसाठी त्या दोघांना जबाबदार धरत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी गेली. त्यांच्या सततच्या त्रासामुळे आपली सहनशक्ती संपली आहे. या प्रकाराबाबत आईने मला आधीच इशारा दिला होता. मात्र आईची माफी मागत त्याने आत्महत्या करीत आहोत असे लिहिले. हे पत्र वाचल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने रेल्वे स्थानकावर धाव घेतली. गणेश सावंतला ताब्यात घेतले. संबंधितास पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. आत्महत्येमुळे प्रश्न सुटणार नसल्याची जाणीव करून देण्यात आली. दरम्यानच्या काळात संबंधिताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. गणेश सावंत यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली.