अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महिन्यापूर्वी केलेल्या कारवाईचा राग मनात ठेवून वाळूमाफियांनी सोमवारी सकाळी तलाठी यादव बच्छाव यांच्यावर वडाळा परिसरात प्राणघातक हल्ला चढविल्याने खळबळ उडाली आहे. सह्याद्री रुग्णालयालगतच्या सिग्नलवर ही घटना घडली. संशयितांनी गज व लाठय़ांच्या सहाय्याने पाठलाग करून बच्छाव यांना बेदम मारहाण केली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा तलाठी संघटनेने लेखणी बंद आंदोलन पुकारले. या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

जिल्ह्यत वाळूमाफियांच्या मुजोरीच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाळूमाफिया वेगवेगळ्या प्रकारे नामोहरम करतात. अशाच कारणातून काही वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयालगत जाहीर फलक झळकवण्याची हिंमत केली गेली होती. अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कारवाई करतानाही माफियांकडून दादागिरी केली जाते. सोमवारची घटना त्याचे निदर्शक ठरली.

नाशिक तहसीलदार कार्यालयातील भरारी पथकाने गेल्या महिन्यात नासर्डी पुलाजवळ वाळू वाहतूक करणारी मालमोटार अडविली होती. त्यावेळी वडनेर दुमालाचे तलाठी यादव विठ्ठल बच्छाव (३५) यांनी मालमोटारीचा पंचनामा केला होता. त्यावेळी मालमोटार चालक व मालकाने वाळू संबंधी कागदपत्रे सादर केली नाहीत. यामुळे ही मालमोटार सील करून शिवाजी वाडी येथे उभी करण्यात आली आहे. या कारवाईचा राग मनात ठेवून वाळूमाफिया बच्छाव यांच्या मागावर होते. अशोका मार्गावर वास्तव्यास असणारे बच्छाव सोमवारी सकाळी आठ वाजता भाजीपाला खरेदीसाठी दुचाकी घेऊन बाहेर पडले. सह्याद्री रुग्णालयालगतच्या सिग्नलवर पाठीमागून आलेल्या दोघांनी बच्छाव यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हाती लाकडी दंडुके व गज असल्याने बच्छाव यांनी पळण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी त्यांचा पाठलाग करून बेदम मारहाण केली. सकाळची वेळ असल्याने परिसरात वर्दळ कमी होती. यामुळे त्यांच्या मदतीला कोणी लवकर आले नसल्याचे सांगितले जाते.

काही वेळाने स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या बच्छाव यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजल्यानंतर नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव-गांगुर्डे, प्रांताधिकारी अमोल एडके यांच्यासह तलाठी संघटनेचे अध्यक्ष निळकंठ उगले व अन्य पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली.  वाळूमाफियांचा तलाठय़ाला जिवे मारण्याचा प्रयत्न होता. दैव बलवत्तर म्हणून ते बचावल्याची प्रतिक्रिया उगले यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात एकूण ५५० तलाठी कार्यरत आहेत. वाळू चोरांविरोधातील कारवाईवेळी पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक असते. आजवर कारवाईवेळी वाळूमाफियांकडून दादागिरी सुरू होती. आता महिनाभर पाळत ठेवून त्यांच्याकडून प्राणघातक हल्ला केला जात असल्याची प्रतिक्रिया तलाठी वर्गातून उमटली.

कारवाई होईपर्यंत लेखणी बंद आंदोलन

तलाठय़ावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यतील सर्व तलाठी कार्यालयात लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले. दुपारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बच्छाव यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविणाऱ्या संशयितांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ही कारवाई होईपर्यंत तलाठी आपले आंदोलन मागे घेणार नसल्याचे निळकंठ उगले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपरोक्त हल्ल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन बच्छाव यांचे जाबजबाब घेतले. जिल्हा प्रशासनाने ही घटना गांभीर्याने घेतली आहे.