14 December 2018

News Flash

जप्त दुचाकी सोडविण्यासाठी दमछाक

दुचाकी सोडविण्यासाठी आर्थिक भूर्दंड भरावा तर लागलाच परंतु ती दुचाकी ताब्यात मिळविण्यासाठी इतकी दमछाक झाली

(संग्रहित छायाचित्र)

आता विनाहेल्मेट चालकाचीही दुचाकी जप्त

शहरातून मार्गक्रमण करताना हेल्मेट परिधान केले नसल्यास त्या चालकाची दुचाकी थेट उचलून नेण्याची करामतही वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांच्या उरफाटय़ा कारभाराची अशी अनुभूती मंगळवारी काही वाहनधारकांना आली.  एका शिक्षकाला तर आपली दुचाकी सोडविण्यासाठी आर्थिक भूर्दंड भरावा तर लागलाच परंतु ती दुचाकी ताब्यात मिळविण्यासाठी इतकी दमछाक झाली  त्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप  नोंदवत संताप व्यक्त केला.

वास्तविक, ‘नो पार्किंग’मध्ये उभी असणारी वाहने टेम्पोत घालून वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केली जातात. त्या ठिकाणी कागदपत्रे पाहून दंडाची आकारणी होते. मंगळवारी मात्र वेगळे घडले. संगीत शिक्षक असलेला युवक दुचाकीवरून चोपडा लॉन्समार्गे बोरगडस्थित शाळेत निघाला होता. गोदावरीच्या पुलालगत पोलिसांकडून वाहनधारकांची नियमित तपासणी सुरू होती. हेल्मेट नसल्याने संबंधित शिक्षकाला थांबविले. बाल दिनानिमित्त शाळेत कार्यक्रम असल्याने त्यांच्या दुचाकीवर साहित्य होते. यामुळे हेल्मेट परिधान करता आले नसल्याचे कारण देऊन त्याने नियमाचे उल्लंघन झाले असल्याने दंड भरण्याची तयारी दर्शविली. दंडाची ही पावती फाडली जात असताना वाहने उचलून नेणारा टेम्पो तिथे धडकला आणि संबंधिताची दुचाकी घेऊन निघून गेला.

या घटनाक्रमाने पोलीस कर्मचाऱ्याने वाहनधारकाला शरणपूर रस्त्यावरील कार्यालयात जाण्यास सांगितले. संबंधित शिक्षक दुपारी कसाबसा वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात पोहोचला. तेव्हा या ठिकाणी अनेक वाहनधारक बाहेर उभे असल्याचे दिसले. दुपारी तासभर भोजनाची सुटी असते. हा कालावधी पूर्ण होईपर्यंत दंड भरणे वा तत्सम प्रक्रिया पार पडणार नसल्याचे लक्षात आले. यामुळे बंद प्रवेशद्वारासमोर अनेकांना थांबून रहावे लागले.

पोटपूजा झाल्यावर तासाभराने कार्यालयाचे कामकाज सुरू झाले. वेगवेगळ्या भागातून उचलून आणलेली वाहने परिसरात आधीच ठेवण्यात आली होती. परंतु, ही वाहने काही वाहनधारकांना दंड भरूनही लगेच मिळणार नव्हती. ज्या कर्मचाऱ्याने कारवाई केली, त्याच्याकडून पावती घेऊन येण्याचा सल्ला दिला गेला. अन्यथा संबंधितांचे टोईंग करणारे वाहन या कार्यालयात येईपर्यंत थांबण्यास सांगण्यात आले. या उत्तरांनी वाहनधारक त्रस्तावले. कारवाई करणारे कर्मचारी रविवार कारंजा येथील असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे गाडी हवी असल्यास संबंधिताकडे जाऊन पावती आणावी लागणार होती.

ज्याचे वाहन पोलिसांनी हेल्मेट परिधान न केल्याने उचलून जमा केले, तो ते सोडविण्यासाठी किती कसरत करणार याचा विचारही पोलीस यंत्रणेच्या लेखी नसल्याचे या घटनाक्रमाने दर्शविले आहे. ‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्याचे काम पोलिसांनी ठेकेदारी तत्वावर दिले आहे. ही वाहने सोडून आता हेल्मेट परिधान न करणाऱ्यांची वाहनेही उचलून नेली जात असल्याने वाहनधारक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे.

आपण जागेवर दंड भरण्याची तयारी दर्शविली होती. त्यावेळी वाहतूक पोलीस भ्रमणध्वनीवर गप्पा मारत बसले. त्यात टोईंग करणाऱ्या टेम्पोतून दुचाकी उचलून नेण्यात आली. हेल्मेट परिधान न केल्याबद्दल ५०० रुपये आणि टोईंगचे ७० रुपये असा एकूण ५७० रुपयांचा दंड भरावा लागला. पोलिसांच्या एकंदर कार्यपध्दतीवर संबंधिताने आक्षेप नोंदवला.

First Published on November 15, 2017 3:59 am

Web Title: nashik traffic police seized bikes for not wearing helmet