दाट लोकवस्तीच्या भागात करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातच मध्यवर्ती बाजारपेठेतील दुकानांमध्ये काम करणारे काही जण सकारात्मक आढळल्याच्या पाश्र्वभूमीवर करोनाची साखळी तोडण्यासाठी विविध व्यापारी संघटनांनी रविवारपासून मध्यवर्ती बाजारपेठ आठ दिवस स्वयंस्फुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेनरोड, शिवाजी रोड, एम.जी. रोड, कानडे मारुती लेन, सराफ बाजार, दहीपूल, रविवार कारंजा यासह परिसरातील दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.

शहरात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. दोन, तीन दिवसात दररोज शंभरच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. टाळेबंदीचे निर्बंध शिथील झाल्यानंतर सम-विषय तत्वानुसार बाजारपेठेतील दुकाने सुरू झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. सुरक्षित अंतर, मुखपट्टी वा तत्सम नियम अनेकांकडून पाळले जात नाहीत. मध्यवर्ती बाजारपेठेतील शेकडो दुकानांमध्ये अंदाजे सात हजार कामगार काम करतात. हे सर्व नानावली, खडकाळी, गंजमाळ, फुलेनगर, वडाळा या करोनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या भागातील आहेत. यातील काही जणांचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर व्यापारी आणि स्थानिक नागरिक धास्तावल्याचे माजी महापौर विनायक पांडे यांनी सांगितले.

व्यापारी, नागरिकांनी स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले. या अनुषंगाने शनिवारी विविध व्यापारी संघटना, फेरीवाले विक्रेता, सराफ व्यावसायिक यांची बैठक झाली.

यावेळी पांडे यांच्यासह माजी महापौर यतीन वाघ, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल, भद्रकाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे उपस्थित होते. चर्चेनंतर मध्यवर्ती बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनाही पूर्वकल्पना

वाढत्या गर्दीमुळे शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची मागणी मध्यंतरी भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली होती. तथापि, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्बंध शिथील होत असतांना पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार नसल्याचे सांगितले होते. व्यापारी संघटनांच्या बैठकीआधी मध्यवर्ती बाजारपेठेतील सद्यस्थिती पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आली. प्रशासनाचा बाजारपेठ बंद करण्याचा आग्रह नाही. व्यापाऱ्यांनी खबरदारी म्हणून स्वत:हून हा निर्णय घेतला. मेनरोड, शिवाजी रोड, रविवार कारंजा येथील घाऊक-किरकोळ किराणा मालाची दुकाने, भद्रकाली, कानडे मारुती लेन, दहीपूल, चांदवडकर लेन, भांडी बाजार, सराफ बाजार, एम.जी. रोड येथील दुकाने पुढील आठ दिवस बंद ठेवली जाणार आहेत. या निर्णयास भांडी व्यावसायिक, सुवर्णकार संघटना आणि किराणा व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. रविवार कारंजा, अशोक स्तंभ, जुने नाशिक भागातील किराना दुकानेही या काळात बंद राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.