05 March 2021

News Flash

शिरवाडकरांच्या शहरात ‘नटसम्राट’चे स्वागत

शहरातील बहुतांश चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकले.

‘नटसम्राट’ चित्रपट पाहण्यासाठी नाशिककरांनी सहकुटुंब अशी गर्दी केली.

‘कोणी घर देतं का घर’… ‘दूर व्हा.. मी ज्युलिअट.. मी हॅम्लेट. मीच तो अप्पासाहेब बेलवलकर’ ‘आयुष्यभर वेगवेगळ्या भूमिका केल्या, पण आजोबाची भूमिका करताना मात्र त्रास होतोय’ या स्वगतासह अन्य काही संवादास क्षणोक्षणी मिळणारी उत्स्फूर्त दाद.. कुठे पाणावलेले डोळे तर कुठे टाळ्यांचा कडकडाट अशा संमिश्र वातावरणात नाशिककरांनी शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटाचे अभूतपूर्व उत्साहात स्वागत केले. शहरातील बहुतांश चित्रपटगृहांत ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकल्याने ऐन वेळी तिकीट घेण्यासाठी आलेल्या चित्रपटप्रेमींना माघारी फिरावे लागले. दरम्यान, नटसम्राटच्या मूळ आशयाला बगल न देता आकारास आलेला नवा ‘नटसम्राट’ चित्र-नाटय़ दोघांची अनुभूती देतो, अशी बोलकी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

साहित्य व नाटय़ क्षेत्रातील अजरामर कलाकृती म्हणून कुसुमाग्रजांच्या ‘नटसम्राट’कडे आदराने पाहिले जाते. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट ते उपेंद्र दाते या ज्येष्ठांनी हे शिवधनुष्य पेलले असले तरी नव्या पिढीला आजही अप्पासाहेब बेलवलकरांचे आकर्षण कायम आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी तरुणाईसह सिने-नाटय़ रसिकांची आवड आणि आर्थिक निकषाचा विचार करत नटसम्राट चित्रपट स्वरूपात आणण्याची संकल्पना मांडली.

अवघ्या ३६ दिवसांत हा चित्रपट पूर्ण होऊन नव्या वर्षांत रसिकांच्या भेटीस आला. शुक्रवारी शहर परिसरातील सिनेमॅक्स, दिव्या अ‍ॅडलॅब, आयनॉक्स यांसह अन्य चित्रपटगृहांत तो दिमाखात झळकला. सिनेमॅक्सचे दिवसभरातील तसेच शनिवारचेही काही प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने अनेकांना ते फलक पाहून माघारी फिरावे लागले. अशीच स्थिती अन्य काही चित्रपटगृहांत राहिली. चित्रपट पाहण्यासाठी ज्येष्ठांसोबत तरुणाईने गर्दी केली आहे. ज्येष्ठांच्या बाबतीत डॉ. लागूंनी साकारलेला ‘अप्पासाहेब बेलवलकर’ पाहिल्याने नाटक डोक्यात ठेवूनच चित्रपटगृहात पाऊल ठेवले. कुसुमाग्रजांच्या लेखणीने ल्यायलेला शब्दसाज नव्या आविष्कारात अनुभवताना काहींच्या भुवया उंचावल्या तर काहींनी ‘कालाय तस्मै नम:’ म्हणत त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, चित्रपट प्रदर्शनापूर्वी झालेली नटसम्राटची प्रसिद्धी, चित्रपटाच्या कमाईची ३० टक्के रक्कम नानाने ‘नाम फाऊंडेशन’ला देण्याची केलेली घोषणा, नवीन वर्षांचे स्वागत अशा कारणांबरोबर ‘नटसम्राट’ आहे तरी काय हे पाहणाऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता कमी नव्हती.

संहिता थोडी जड

कुसुमाग्रजांचे ‘नटसम्राट’ नाटक आधी पाहिले नव्हते. अस्खलित मराठी असल्याने संहिता थोडी जड वाटली. मात्र आशय संपन्नतेला तोड नाही. चित्रपटात असलेले मद्याचे दृश्य, शिव्या, अनावश्यक प्रसंग यांना कात्री लावता आली असती. पण अप्पासाहेब हे पात्र तसेच असल्याने ते तसेच रसिकांसमोर येणे गरजेचे होते असे मला वाटते.

अमृता नाशिककर (गृहिणी)

तोड नाही

साहित्य व नाटय़ विश्वात ‘नटसम्राट’ ही अजरामर कलाकृती ठरली आहे. नाटकाचे चित्रपटात रूपांतर कसे होते हे ‘कटय़ार’ने आधीच सिद्ध केले. त्यामुळे नटसम्राटविषयी उत्सुकता वाढली. महेश मांजरेकर, नाना पाटेकर ही दिग्गज मंडळी तोडीस तोड असल्याचे चित्रपट पाहताना प्रकर्षांने जाणवते. नाटकातील मूळ आशयाला पटकथेच्या माध्यमातून छान जोड दिली आहे.

धनंजय पाठक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2016 3:41 am

Web Title: natsamrat welcome in shirwadkar city
टॅग : City
Next Stories
1 पालिका सभेचा चहापान, अल्पोपाहार खर्च ७६ लाखांवर
2 नवीन पिढीच्या फारकतीमुळे परंपरागत कौटुंबिक व्यवसायांना घरघर
3 काशीकापडी समाजातील अनिष्ठ प्रथांना आव्हान
Just Now!
X