पावसाच्या हजेरीनंतर आलेल्या सुटीतही शाळा नियमित

एरवी शिक्षक नसलेल्या वर्गात लहान मुलांचा सुरू असणारा गोंधळ, एकमेकांच्या खोडय़ा काढण्याची सुरू असलेली धडपड. त्यातून घडणाऱ्या गंमतीजमती हे सर्वासाठी सरावाचे असले तरी शहरापासून दूर असलेल्या पक्ष्यांच्या शाळेत दररोज पर्यावरणप्रेमी असाच काहीसा अनुभव घेत आहेत. काही अंशी मानवी वावर असला तरी पक्ष्यांचा  सहज वावर, अन्न आणि पाणी मिळवण्याची त्यांची धावपळ डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.

तीन वर्षांपासून नेचर क्लब ऑफ नाशिक ही पर्यावरणप्रेमी संस्था शहर परिसरात आढळणारे पक्षी, त्यांचे जीवनमान याचा अभ्यास करत आहे. संस्थेने यंदा मानवी कोलाहलापासून दूर ही शाळा सुरू केली. पहिल्या पावसाच्या हजेरीनंतर शाळेला सुट्टी लागणार असली तरी पक्ष्यांची ही शाळा नियमित भरणार आहे. गोदापार्कपासून अवघ्या तीन किलोमीटरवर फाल्गुने यांच्या फ्लोरल सोजर्न येथे ही शाळा सध्या सुरू आहे. दोन एकराच्या झाडांच्या गावात ९९ प्रजातीची तब्बल ६०० देशी झाडे आहेत. शेतीचा आराखडा तयार करत त्यांनी अनोखा प्रयोग केला आहे. शहराजवळील शेती नष्ट होऊन त्या ठिकाणी मोठे गृह प्रकल्प उभे राहिले. शेतात राहणारे पक्ष्यांचे स्थलांतर झाल्याचे  ठळकपणे अधोरेखित होत आहे.

पक्ष्यांसाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून झाली आहे.  याविषयी क्लबचे प्रा. आनंद बोरा यांनी माहिती दिली.

शेतात समूहाने राहणारा मुनिया हा पक्षी शहरात जोडी करून राहू लागला आहे. शहरात पोपट घरटी आणि शेतात खाद्य खाण्यासाठी येत असल्याचे दिसून आले. सुगरणीचे घरटे विहिरी कमी होत असल्याने चिंचेवर बनविण्यास सुरूवात झाली आहे. शिकारी हनीबझड, शिक्रा हे पक्षी देखील येथे बघावयास मिळतात. तितराचा पूर्ण परिवार शाळेत येणाऱ्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभा राहतो.

हळद्या मात्र  त्याचा सुंदर आवाज काढून येणाऱ्याचे लक्ष वेधतो. पोपट मक्यावर ताव मारत मधल्या सुटीत जणू काही धमाल करतो. कोतवाल आणि कावळ्यांची मारामारी सोडविण्यासाठी शाळेतील शिक्षकांना पुढे यावे लागते. किंगफिशर भला मोठा मासा पकडून इतर मुलांना चिडवतो, तर चष्मेवाला फळे खातांना जणू गणिताचा अभ्यास करतोय असा भास  होतो, असे प्रा. बोरा यांनी सांगितले. पाटालगतच्या बाभळीची मोठय़ा प्रमाणात तोड झाल्याने अनेक पक्षी तो परिसर सोडून गेले आहेत.   नाशिककरांसाठी ही शाळा लवकरच खुली होईल, असेही प्रा. बोरा यांनी सांगितले.

३५ जातींच्या पक्ष्यांची हजेरी

परिसरात हळद्या, स्वर्गीय नर्तक, सातभाई, सूर्यपक्षी, दयाळ, नाचण, कोकिळा, भारद्वाज, बुलबुल, तांबट, जंगली मैना, कावळे, किंगफिशर, बगळे, शराटी आदींसह ३५ जातीच्या पक्ष्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. मोरांची संख्या या परिसरात वाढल्याचेदेखील दिसून आले. रोज सकाळी शाळेच्या प्रवेशद्वारावर २० ते २५ मोर सुंदर आवाज काढून जणू शाळेची प्रार्थना म्हणतात. शाळेतील फालसा, आवळा, तूतु, चेरी, गोंदनी, हळदु, मोहगणी, कळम, कैलासपती, सीतेचे अशोक, रूद्राक्ष, उंबर, पिंपळ, वड आदी वृक्षांमुळे इतका किलबिलाट या ठिकाणी बघावयास मिळतो. या शाळेत फुलपाखराच्या आठ जाती असून त्यांचा मुक्त वावर आहे. मुंगूस, साप, इतर कीटक, फुले यांचा अभ्यास सध्या सुरू आहे.