२४ तास दर्शनाची व्यवस्था; प्लास्टिकमुक्त उत्सवासाठी कठोर निर्बंध; कालिका देवस्थान परिसरात सुरक्षा व्यवस्थेला अधिक प्राधान्य

नवरात्रोत्सवासाठी साडेतीन पीठापैकी एक असलेल्या नांदुरी येथील श्री सप्तशृंगी गडासह शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिर देवस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आहे. गर्दीवर नियंत्रणासह सामाजिक प्रबोधनावर यंदा भर देण्यात येणार आहे. गडावर बोकडबळी प्रथा बंद करण्यात आली असून प्लास्टिकमुक्त उत्सवासाठी सप्तशृंगी निवासिनी न्यासातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहे.

जिल्ह्य़ात वेगवेगळ्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्याने यात्रा काळात सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. स्वच्छतेकरिता अतिरिक्त सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्लास्टिक बंदीबरोबरच खासगी वाहनांना उत्सव काळात गडावर बंदी करण्यात आली आहे. गडाच्या पायथ्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडय़ांव्दारे भाविकांना गडावर नेण्यात येणार आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सहा कोटी रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला असून बोकड बळीची परंपरा(प्रथा) बंद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. उत्सव नियोजनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत भाविकांच्या सुरक्षेबरोबरच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस साहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस उपअधीक्षक वाघमारे आदी उपस्थित होते. गडावर प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. उत्सव काळात भाविकांसाठी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. फ्युनिकुलर ट्रॉलीचा या उत्सव काळात भाविकांना फायदा होणार आहे. दर्शनासाठी पायऱ्यांनी जाणाऱ्या २४० भाविकांचा गट सोडण्यात आल्यावर ट्रॉली दोन फेऱ्या करून १२० भाविकांची ने-आण करणार आहे.

कालिका देवस्थान परिसरात २४ सीसीटीव्ही

उत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्री कालिका देवस्थानतर्फे विश्वस्त मंडळाच्या वतीने शासकीय आस्थापनातील पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील अध्यक्षस्थानी होते. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज करंजे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश देविकर यांनी यात्रा काळात असणारा पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियोजनाविषयी माहिती दिली. अनिरुद्धबापू अकादमीच्या पाचशे स्वयंसेवकांना नियुक्त करण्यात आले आहे. देवस्थान परिसरात ठिकठिकाणी २४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यंदा देवस्थानच्या वतीने सशुल्क दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.