धास्तावलेल्या शेजाऱ्यांकडून माहिती देण्याची खबरदारी, जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

नाशिक : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी विदेशांतून आलेल्यांचा शोध घेतला जात असला तरी प्रकृती ठणठणीत वाटत असल्याने अनेकांकडून ती माहिती दिली जात नाही. खासगी रुग्णालये माहिती देण्यास टाळाटाळ करतात. यामुळे संबंधितांपर्यंत पोहचण्यास मर्यादा येतात. खासगी रुग्णालये, तारांकित हॉटेलच्या कार्यपद्धतीला चाप लावण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.

दुसरीकडे विदेशांतून परतलेल्या व्यक्तीचा धसका आसपास वास्तव्यास असणाऱ्या शेजाऱ्यांनीच घेतला आहे. संबंधिताने वैद्यकीय उपचार घेतले नसल्याचे लक्षात आल्यावर शेजारी ही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्याची खबरदारी घेत आहेत. संबंधितांच्या माहितीच्या आधारे विदेशातून आलेल्या तिघांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत करोनाची लागण झालेला एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी या आजाराची लागण झालेल्या देशातून किंवा विदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्यास देखरेखीखाली ठेवण्याचे नियोजन यंत्रणेने केले आहे. विदेशातून आलेले भारतीय आणि परदेशी पर्यटक यांची माहिती विमानतळांवरून प्रशासनास देण्याची व्यवस्था होत आहे.

संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती कळविल्यास संबंधितांची वैद्यकीय चाचणी करून पडताळणीची सुविधा उपलब्ध केलेली आहे. परंतु विदेश भ्रमंती करणारे अनेक जण ही माहिती देणे टाळतात. खासगी रुग्णालयात तपासणीची त्यांची आर्थिक क्षमता असते. बहुदा याच कारणास्तव खासगी रुग्णालय अशा रुग्णांची माहिती देत नसावेत, असा अंदाज आहे. विषाणूचा संसर्ग वाढू नये, माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक स्थिती उद्भवू नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

विदेशातून आलेल्या २२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी लक्षणे जाणवलेल्या पाच रुग्णांचे तपासणीचे अहवाल नकारात्मक आले आहेत. विदेशातून भ्रमंती करून आलेले काही स्थानिक नागरिक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. अशा तीन जणांची माहिती आसपासच्या रहिवाशांनी आरोग्य विभागाला दिली. त्या आधारे पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी संबंधितांची तपासणी करून त्यांना देखरेखीखाली ठेवल्याचे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी सांगितले. म्हणजे, संबंधित व्यक्तीने माहिती न दिल्यास शेजारील नागरिक ती महापालिकेला कळविण्याची खबरदारी घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हॉटेल ताज गेट वे, सुला वाइन आणि एक्स्प्रेस इन या हॉटेलना पत्र देऊन परदेशी पर्यटकांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. वैद्यकीय पथक दररोज संबंधित ठिकाणी तपासणी करत असल्याचे रावते यांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांकडून ग्रेट ब्रिटनमधून आलेल्या दोन जणांची माहिती दिली गेली. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ते ठणठणीत असल्याचे निष्पन्न झाले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांनी, कुटुंबीयांनी त्याबाबत माहिती आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

करोनाचे आणखी दोन संशयित दाखल

करोनाग्रस्त देशातून आलेली युवती आणि स्थानिक पातळीवर वास्तव्यास असणाऱ्या आईला खबरदारी म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थिनी दुबईत शिक्षण घेते. ३ मार्च रोजी ती भारतात परतली. शहरात ती आईसोबत राहात असल्याने उभयतांची प्राथमिक तपासणी करून त्यांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले आहे. मुलीचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल बुधवारी प्राप्त होईल, असे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. विदेशातून आलेल्या रुग्णांना १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाते. त्यांची त्यांच्या घरीच नियमित तपासणी केली जाते. पाच करोना संशयितांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.