आयुक्तांकडून २०६१ कोटींचे अंदाजपत्रक स्थायीला सादर; प्रथमच प्रभाग विकास निधीची तरतूद

नाशिक : महापालिकेचे २०२०-२१ या वर्षांचे दोन हजार ६१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केले. काही वर्षांतील करवाढ सुचविण्याच्या परंपरेला यंदा छेद देण्यात आला. कोणतीही करवाढ न सुचविता विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. नगरसेवक निधीसाठी आग्रही राहणाऱ्या सदस्यांसाठी यंदा प्रथमच प्रभाग विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात बस सेवा सुरू करणे, महिलांसाठी स्वतंत्र जलतरण तलाव, नाटय़गृहांची उभारणी, बहुमजली वाहनतळ, औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचा विकास आदींचा अंतर्भाव आहे.

आयुक्त गमे यांनी स्थायी सभापती उद्धव निमसे यांना अंदाजपत्रक सादर केले. रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, विद्युतीकरण, परिवहन, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधांची पूर्तता करताना समतोल विकासाचा विचार करण्यात आल्याचे गमे यांनी सांगितले. आगामी वर्षांत जीएसटीतून आठ टक्के वाढ गृहीत धरून १०८१ कोटी रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. अंदाजपत्रकात जुन्या कामांचे ९६५ कोटींचे दायित्व आहे. मागील काही वर्षांत नगरसेवक निधी खर्च झालेला नाही. नगरसेवक निधीसाठी आग्रह धरणारे सदस्य तो या लेखाशीर्षांखाली खर्च करत नाही. अंदाजपत्रकात यासाठी प्रति नगरसेवक नऊ लाख ४४ हजार म्हणजे एकूण १२ कोटींची तरतूद करण्यात आली. याशिवाय प्रथमच प्रभाग विकास निधीसाठी प्रति नगरसेवक ३० लाख रुपये अत्यावश्यक आणि स्थानिक स्वरूपाची कामे करता येतील. शिवाजी उद्यान नूतनीकरण, सिडकोतील मध्यवर्ती बगीचाचा विकास यासाठी ३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नाशिक रोड, पंचवटी, गंगापूर रस्ता येथे नाटय़गृह बांधण्यात येणार आहे. सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे पालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढला आहे. आगामी वर्षांत कर्मचारी वेतनासाठी ४०७.६३ कोटी तर निवृत्तिवेतनासाठी ११० कोटींची तरतूद करण्यात आली.

उपभोक्ता कराची सूचना

पाणीपुरवठा यंत्रणा ना नफा ना तोटा तत्त्वावर चालविण्यासाठी पाणी उत्पादन खर्चाइतका उपभोक्ता आकार (पाणीदर) लावणे आवश्यक असल्याचे अंदाजपत्रकात म्हटले आहे. सद्य:स्थितीत पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवरील खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. ही तफावत भरून काढण्यासाठी आयुक्तांनी हा उपाय मांडला आहे.

मोफत अंत्यसंस्कार योजनेत फेरबदल

सध्या सर्वधर्मीयांना अंत्यसंस्कार, दफनविधीसाठी मोफत साहित्य दिले जाते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भविष्यात मोक्षकाष्ठ, डिझेल अथवा विद्युतदाहिनी यासारख्या पर्यावरणपूरक अंत्यविधीचा पर्याय स्वीकारल्यास त्यांनाच केवळ मोफत अंत्यसंस्कार योजनेचा लाभ देण्याविषयी विचाराधीन आहे. उद्यानातील पालापाचोळा, वृक्षछाटणी कचऱ्यापासून निर्मिलेल्या इंधन विटांचा वापर अंत्यविधीसाठी करण्याचे प्रयोजन आहे.

ठळक वैशिष्टय़े

*  महापालिकेवर जुन्या कामांचे ९६५ कोटींचे दायित्व

*  सातव्या वेतन आयोगामुळे तिजोरीवर भार वाढणार

*  सातपूरपाठोपाठ पंचवटीत महिलांसाठी स्वतंत्र जलतरण तलाव

*  रामायण बंगल्याजवळील जागेत बहुमजली वाहनतळ

*  पेलिकन पार्कचे विकसन

*  पालिका शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजल यंत्र

*  नगरसेवक स्वेच्छा निधीला प्रभाग विकास निधीची जोड

*  नाशिक रोड, पंचवटी, गंगापूर रोड येथे नाटय़गृह

*  नाशिक रोड, पंचवटीत विद्युत दाहिनी

*  १० मोहल्ला क्लिनिक