13 August 2020

News Flash

बहुप्रतीक्षित बस सेवेला आगामी आर्थिक वर्षांचा मुहूर्त

दीड ते दोन वर्षांपासून चर्चेत असणारा परिवहन सेवेचा विषय आगामी वर्षांत प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे.

बस डेपो, टर्मिनलसाठी ७० कोटींची तरतूद

नाशिक : महापालिकेची बहुप्रतीक्षित परिवहन सेवा आगामी वर्षांच्या पूर्वार्धात कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. परिवहन सेवेसाठी नवीन डेपो, टर्मिनल, बस थांबे आणि अन्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अंदाजपत्रकात ७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात १० लाखांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले. बस सेवा कधी सुरू होते, यावर उत्पन्नात भर पडणार आहे.

दीड ते दोन वर्षांपासून चर्चेत असणारा परिवहन सेवेचा विषय आगामी वर्षांत प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. राज्य परिवहनने शहरात सेवा देण्यास नकार दिल्यानंतर सत्ताधारी भाजपने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. राज्यातील एकाही महापालिकेची बस सेवा फायद्यात नाही. त्यामुळे ही सेवा महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरेल, अशी प्रतिक्रिया विरोधी गोटातून उमटली होती. संबंधितांनी त्यास विरोधही केला. परंतु, भाजपने हा प्रतिष्ठेचा विषय करत पुढे रेटला. महापालिकेने बस सेवा सुरू करण्याचे जाहीर केल्यापासून एसटीने आपल्या बस फेऱ्यांमध्ये लक्षणीय कपात केली. त्याचा फटका विद्यार्थी, नागरिकांना सहन करावा लागत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महापालिकेच्या बस सेवा, मेट्रोसारख्या खर्चीक प्रकल्पांवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला होता. नंतर परिवहन सेवेला त्यांचा विरोध मावळला. परिवहन सेवेचा विषय इतका पुढे गेला होता की, पालिकेला मागे फिरणे अशक्य होते. या सेवेसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. ऑपरेटर नेमणे, नवीन डेपो, टर्मिनल, बस थांबे आणि अन्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे गमे यांनी सांगितले.

अनेक कामे निविदा प्रक्रियेत

या व्यवस्थेसाठी आडगाव नाका, तपोवन आणि नाशिकरोडच्या सिन्नर फाटा येथे बस डेपोची निर्मिती प्रस्तावित आहे. अंदाजपत्रकात त्यासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली. त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच ही कामे सुरू होतील. बसमध्ये कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, सूचना देण्यासाठी व्यवस्था, टर्मिनल, बस थांब्यांवरील डिजिटल फलक, मुख्य नियंत्रण कक्ष, प्रवाशांसाठी वेळापत्रक, जीपीएसद्वारे गाडय़ांचा ठावठिकाणा, भाडे आकारणी, स्मार्ट कार्ड देण्यासाठी लागणारी यंत्रे आदींसाठी निविदा काढण्यात आली आहे.

परिवहन सेवेसाठी सीएनजी, इलेक्ट्रिक आणि डिझेल या प्रकारच्या सुमारे ४०० गाडय़ा वर्षभराच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने उपलब्ध केल्या जातील. प्रथम टप्प्यातील गाडय़ांचा पुरवठा होऊन आगामी वर्षांच्या पूर्वार्धात बस सेवा कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. बस सेवेचे वेळापत्रक, मार्ग, अन्य माहिती भ्रमणध्वनी अ‍ॅपवर उपलब्ध केली जाईल.

– राधाकृष्ण गमे,आयुक्त, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 3:13 am

Web Title: nmc to start city transportation services in nashik in next financial years zws 70
Next Stories
1 ज्येष्ठ संघ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन
2 महाविकास आघाडीविरोधात भाजपचे आंदोलन
3 स्थायी सदस्य निवडीवरून असंतोष
Just Now!
X