नांदगाव तालुक्यात महिनाभरापासून पाऊस गायब

नांदगाव : पावसाळा सुरू झाल्यावर प्रारंभी नांदगाव तालुक्यात एक-दोनवेळा थोडा पाऊस पडला. यंदा अधिक पर्जन्यमान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने आशा बाळगलेल्या शेतकऱ्यांनी पहिल्या पावसाच्या भरवशावर पेरण्याही केल्या. त्यानंतर गायब झालेला पाऊस अजूनही न आल्याने माणिकपुंज, गणेशनगर, मोहितेवाडी येथील १५० एकर क्षेत्रातील पेरणीवर पुन्हा नांगर फिरवावा लागला आहे.

दुष्काळग्रस्त नांदगाव तालुक्यात यंदा सुरुवातीलाच एक-दोन वेळा पाऊस झाल्याने आशा पल्लवित झालेल्या शेतकऱ्यांनी अल्प पावसावर मका, बाजरी, कपाशी आदी पिकांच्या पेरण्या घाईघाईत उरकल्या, परंतु नंतर पावसाने हुलकावणी दिली. पाऊस आज येईल, उद्या येईल या आशेवर शेतकरी दिवस काढत असतांना पावसाने मात्र भ्रमनिरास केले आहे. पेरण्या करून महिना उलटला असला तरी पिकांना पाणी न मिळाल्याने पिके मरायला टेकली आहेत. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. असे पीक पुन्हा तग धरणे शक्य नसल्याने अधिक दिवस वाट पाहण्यापेक्षा या पिकांवर दुबार पेरणीसाठी नांगर फिरविणेच योग्य असा निर्णय घेत माणिकपुंज परिसरातील शब्बीर शेख, शिवाजी महाले, नितीन बच्छाव, बाबासाहेब सोनवणे, दादाभाऊ  दाभाडे, नवनाथ ढोकरे, वाल्मिक निकम यांच्यासह २५ ते ३० शेतकऱ्यांनी पिकांवर नांगर फिरवला. पाऊस पडल्यास दुबार पेरणीचे त्यांचे नियोजन आहे.

ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांची मात्र यात पंचायत झाली. दुबार पेरणीसाठी पुन्हा बी-बियाणे घ्यावे लागणार आणि त्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ते दुबार पेरणी करू शकत नाहीत. पाऊस आज ना उद्या येईल, या आशेवर ते आहेत.

नाशिक जिल्ह्य़ात नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी जिल्ह्य़ातील नांदगाव, चांदवड, येवला, बागलाण, देवळा, मालेगाव, कळवण या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.