18 April 2019

News Flash

‘पोषण आहार अभियान प्रभावीपणे राबवा’

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या आवारात प्रदर्शनाद्वारे अंगणवाडी सेविकांनी विविध आहारांची माहिती दिली.

कुपोषण निर्मूलनासाठी जिह्यत ग्राम विकास केंद्रामार्फत चांगले काम झाले असून पोषण आहार अभियानदेखील प्रभावीपणे राबवून ग्रामीण भागात आहाराविषयी जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार यांनी केले.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात एक ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले.

कुपोषण निर्मूलनाप्रमाणे एक सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानात जिल्ह्य़ाने चांगले काम करून पोषण आहाराचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन पगार यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सर्व विभागांच्या सहकार्याने जिल्ह्यात सर्व क्षेत्रात जलद काम सुरू असून त्यामुळे आपली जबाबदारी वाढली असून पोषण अभियानातही सर्व विभागांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश दिले. कार्यशाळेत दृक्श्राव्य माध्यमातून डॉ. नरेश गीते यांनी संवाद साधला. स्वच्छ सर्वेक्षण, कुपोषण निर्मूलन, पंतप्रधान आवास योजना यामध्ये केलेल्या कामाप्रमाणे पोषण आहार अभियानातही काम करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात महिला, बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी पोषण आहार अभियानाबाबत माहिती दिली. पाणी-स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी अंगणवाडीत शौचालय सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. सुरेंद्र सिंग यांनी स्तनपानाबाबत माहिती दिली. अन्न-औषध विभागाचे अधिकारी देवरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या वतीने जिल्हा परिषद आवारात विविध आहारांबाबत प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यशाळेस बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, पर्यवेक्षिका तसेच दृक्श्राव्य माध्यमाद्वारे गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

First Published on September 5, 2018 3:37 am

Web Title: nutrition diet campaign effectively says chairman yatindra pagar