उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ इतर मागासवर्गीय समाज काँग्रेससोबत होता. मधल्या काळात दुर्लक्ष झाले आणि हा घटक काँग्रेसपासून दूर गेला. त्याचा फायदा भाजपने घेतला.  परंतु, आता भाजपने ओबीसींसह सर्वाचा भ्रमनिरास केला असल्याने  या घटकाला आता काँग्रेसमध्ये पाठबळ दिले जाणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे प्रमुख डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

मंगळवारी काँग्रेस कार्यालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी विभागाची बैठक पार पडली. तासभर उशिराने सुरू झालेल्या बैठकीत प्रतिक्षा करूनही फारसे पदाधिकारी-कार्यकर्ते फिरकले नाहीत. ४० ते ५० जणांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीचे उत्तम नियोजन झाल्याचे प्रशस्तीपत्रक पाटील यांनी दिल्यावर उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

यावेळी ओबीसी विभागाचे सरचिटणीस प्रकाश सोनवणे, काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर आदी उपस्थित होते. ओबीसी समाज पक्षापासून दूर का गेला याची कारणे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडली. आंदोलने, बैठका यावेळी इतर मागासवर्गातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आठवण पक्षाला होते. सत्तेत असताना जेव्हा महत्वाची जबाबदारी वा समित्यांवर प्रतिनिधीत्व देण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा विचार होत नाही. तळागाळात इतर मागासवर्गीय गटातील कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात. पदरमोड करतात. परंतु, त्यांच्यासह महिला पदाधिकारी-कार्यकर्त्यांनाही मानसन्मान मिळत नसल्याची खंत शहराध्यक्षा वत्सला खैरे यांनी व्यक्त केली.  शहराध्यक्ष शरद आहेर यांनी पक्षाचे काम विस्तारण्यासाठी सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना संघटनात्मक पदे देण्याचा गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज मांडली. ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष पदे रिक्त आहेत. काही विशिष्ट समाजातील व्यक्तींना महत्वाची पदे दिली गेल्याने ओबीसी काँग्रेसवर नाराज झाला. पुढील काळात तशी चूक होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता बहुतांश पदाधिकाऱ्यांनी मांडली. उल्हास पाटील यांनी ओबीसींवर पक्षाकडून झालेल्या अन्यायाची वरिष्ठ नेत्यांची गांभिर्याने दखल घेतल्याचे सांगितले. इतर मागासवर्गीय घटकाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडक ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने ओबीसींचे संघटन करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नाशिक जिल्ह्यत सर्वेक्षण केल्यास ओबीसींची सद्यस्थिती लक्षात येईल. त्यांचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केल्यास आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नावे सुचविल्यास ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांची त्वरित नियुक्ती केली जाईल. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात येणाऱ्या अडचणी, ऑनलाईन अर्ज भरताना होणारा त्रास अशा विविध प्रश्नांवर काम करावे लागणार असल्याचे पाटील यांनी सूचित केले. प्रकाश सोनवणे यांनी काही चुका झाल्यामुळे काँग्रेसला पराभूत व्हावे लागले, परंतु, सर्व जाती धर्माला सामावून घेणारा काँग्रेस हा पक्ष आहे. ओबीसी घटकाला न्याय देऊन पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.