जुन्या गाडीला नवे रूप; स्पोर्टस कार तयार केली 

पाश्चिमात्य देशातील चकचकत्या नव्या गाडय़ा केवळ पाहण्यापेक्षा जुन्या गाडीला नवे रूप देत येथील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘परीस’ ही अनोखी स्पोर्टस कार तयार केली आहे. आर्थिक तसेच अन्य अडचणींना तोंड देत पाच महिन्यांपेक्षा अधिक प्रयत्नानंतर ‘परीस’ आकारास आली असून लवकरच ही कार ‘नाशिक ऑटो फेस्टिव्हल’मध्ये कारप्रेमींना पाहण्यास मिळणार आहे.

पाथर्डी फाटय़ाजवळील नरहरी नगरमधील सुनील बोराडे, सुशील बारी आणि शंतनू क्षीरसागर हे तिघेही समविचारी मित्र एकत्र आले. वाहन उद्योग-व्यवसायात स्वतचे असे काही हवे, हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात होता. वाहन रस्त्यावर आणण्यासाठी लागणारे भांडवल, अन्य अडचणी यामुळे त्यांनी जुन्याच मीसीव्हीसी लान्सर या कारला स्पोर्टस कारचे रूप देण्याचे काम सुरू केले.

कार तयार करण्यासाठी त्यांनी प्रथम आराखडा तयार केला. त्यावर अभ्यास करून नंतर क्लेमध्ये आणि फोटोशॉपमध्ये प्रतिकृती तयार केली. लाल रंगाची चकाकी असणारी रेसिंग कार तयार करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आर्थिक अडचण भेडसावत होती. यासाठी मित्रपरिवार, नातेवाईक तसेच क्राऊड फंडमधून त्यांनी कार तयार करण्यासाठी लागणारे भांडवल मिळवले. दुसरीकडे कार तयार करण्यासाठी जागेचा शोध सुरू केला. शेतात निवारागृह तयार करीत त्यांनी कामास सुरुवात केली. एकदा अवकाळी पावसामुळे छप्परच गाडीवर पडले. पाथर्डी फाटय़ाजवळील नवले मळ्यात पुन्हा गाडी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. तब्बल पाच महिन्यांच्या परिश्रमानंतर ‘परीस’ आकारास आली. या कारचे वैशिष्टय़ म्हणजे असा आराखडा भारतातील कोणत्याही कारमध्ये नाही. टाकाऊतून टिकाऊ चा उपयोग करून ही कार बनविण्यात आली. या कारला त्यांनी मिशिबीशी लान्सरचे यंत्र बसविले असून कारची लांबी 17 फूट, तर उंची साडेतीन फूट आहे.

रुंदी पावणेसहा फूट आहे. पेट्रोलवर चालणारी ही कार एक लिटरमध्ये 10 किलोमीटर पळते. कारमध्ये केवळ दोन जण बसू शकतात. लवकरच ही कार नाशिक ऑटो फेस्टमध्ये पाहण्यास मिळणार आहे.

उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार

मॅकेनिकल शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधतांना स्वतचे काही असावे या विचाराने आम्ही मित्रंनी काम सुरू केले. कोणीही विचारेल तुमचे काय, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ‘लाल रेसिंग कार’ तयार केली. स्टार्ट अप, मेक इनच्या माध्यमातून लवकरच उद्योग क्षेत्रात पाऊल टाकणार आहोत.

– सुशील बारी