आवक दीड पटीने वाढली, भावाची घसरण कायम

नाशिक : जिल्ह्य़ातील लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह इतरही बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक प्रचंड वाढली आहे. एकटय़ा लासलगाव बाजारात दररोज ३० हजार तर पिंपळगाव बाजार समितीत २२ हजार क्विंटल आवक होत आहे. प्रचंड उत्पादन आणि मागणीचा अभाव यामुळे महिनाभरात कांदा दरात प्रति क्विंटलला सरासरी १३० रुपयांनी घट झाली आहे. गेल्या महिन्यात लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी ५८० रुपये भाव मिळाला होता. या महिन्यात तो सरासरी ४५० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

वर्षभरात काही अपवाद वगळता कांद्याला समाधानकारक भाव मिळाला नव्हता. केंद्र सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात प्रोत्साहनपर अनुदानात दुपटीने वाढ केली. परंतु, त्यामुळे भावात सुधारण होऊ शकली नाही. बाजार समित्यांचे आवार कांद्याने भरून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या कांद्याचा सध्या जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये महापूर आला आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीच्या मध्यावर लाल कांद्याची आवक दीड पटीने वाढली आहे. लासलगाव बाजार समितीत गेल्या महिन्यात दररोज २० हजार क्विंटल आवक होती. या महिन्यात ती ३० हजार क्विंटलवर गेली आहे. पिंपळगाव बाजार समितीत यापेक्षा वेगळे चित्र नाही. मागील वर्षी उन्हाळ कांदा बाजारात आल्यापासून दिवाळीचा काही काळ वगळता उत्पादकांना उत्पादन खर्चही हाती आलेला नाही. आज संपूर्ण जिल्ह्य़ात लाल कांद्याचे अमाप उत्पादन असून दररोज जिल्ह्यातील बाजार समितीत हजारो टन कांदा विक्रीला येत आहे.

लासलगाव बाजार समितीत जानेवारी महिन्यात कांद्याला सरासरी ५८० रुपये भाव मिळाला होता. फेब्रुवारीत प्रति क्विंटलचा हा दर ४५० रुपयांवर आला आहे. महिनाभरात कांदा भावात १३० रुपयांनी घसरण झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, याच काळात केंद्र, राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही निर्णय घेतले होते. त्याचाही बाजारपेठेवर परिणाम झाला नाही. निर्यात प्रोत्साहनपर अनुदान पाचवरून १० टक्क्य़ांवर नेण्यात आले. परंतु, त्याचाही फारसा लाभ झालेला नाही. राज्य शासनाने नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारी महिन्यात विक्री झालेल्या कांद्यास २०० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले आहे. पुढील काळात उत्पादित होणाऱ्या कांद्यासाठी अनुदान सुरू ठेवावे, ते प्रतिक्विंटल ५०० रुपये करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. चार महिन्यांत बहुतांश बाजार समितीत लाल कांदा सरासरी ४०० ते ५०० रुपये क्विंटल दराने विक्री झाला. त्यातून उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे शासनाने प्रति शेतकरी २०० क्विंटल आणि प्रति क्विंटल २०० रुपयांची मर्यादा हटवून प्रत्येक शेतकऱ्याच्या संपूर्ण कांद्याला किमान ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.

कारण काय ?

स्थानिक पातळीवर कांद्याची प्रचंड आवक सुरू असताना गुजरातचा कांदा बाजारात आला आहे. त्या कांद्याचा आकार आणि दर्जा चांगला असल्याने पंजाब, दिल्ली, हरियाणा या प्रमुख बाजारपेठेत गुजरातच्या कांद्याची मागणी वाढत आहे. नाशिकच्या कांद्याची देशांतर्गत बाजारपेठेत पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. पुणे, चाकण, लोणंद भागात गावठी कांदा बाजारात आल्याने लाल कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला. चाकण, पुणे भागातून नवीन गावठी कांद्याची मलेशिया, दुबई, कोलंबो येथे निर्यात सुरू झाली आहे.