शहरातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्ष शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला असून निष्क्रिय पोलीस यंत्रणेत सुधारणा व्हावी यासाठी भाजपचे स्थानिक आमदार काहीच करत नसल्याचा आक्षेप नोंदविला आहे. सर्वसामान्यांचा पोलीस यंत्रणा आणि शासनावरील विश्वास उडाला आहे इतकी भयावह स्थिती निर्माण झाल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. काँग्रेसने भाजप विरोधात आंदोलन छेडण्याचा तर शिवसेनेने नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. जयंत जाधव यांनी शासनाचा पोलिसांवर अंकुश नसल्याचे टीकास्त्र सोडले. शहरात पोलिसिंग राहिलेले नाही. शासनाचा यंत्रणेवर अंकुश नाही. यामुळे गुन्हेगारीत लक्षणिय वाढ होऊन स्थिती अतिशय बिकट झाली आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांच्याकडे असताना भाजप, सेना व प्रसारमाध्यमांनी कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरून टिकेची मोठी झोड उठविली होती. त्यावेळी रस्त्यावर उतरणारे भाजपचे पदाधिकारी आज सत्ताधारी असताना रस्त्यावर का उतरत नाही ? विधीमंडळात हा प्रश्न वारंवार उपस्थित केल्यावर केवळ उपाय सुरू असल्याचे सांगितले जाते. पोलीस जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही, तोपर्यंत परिस्थितीत बदलणार नाही. ‘कोम्बिंग ऑपेरेशन’ही बंद झाले आहे. निष्क्रिय अधिकाऱ्यांना बदलण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रयत्न करू शकतात. पण, त्यांच्यामार्फत तसेही काही प्रयत्न होत नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
काँग्रेसने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून भाजप विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्याचे गृहमंत्रीपद मुख्यमंत्री अर्थात भाजपकडे आहे. शासनाचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस यंत्रणेला योग्य दिशा दाखविली जात नाही. भाजपच्या स्थानिक आमदारांकडून वेगवेगळा सल्ला दिला जातो. त्यामुळे पोलीस यंत्रणा कोंडीत सापडली आहे. कोणाचे ऐकावे हा प्रश्न त्यांना पडतो. विरोधात असताना भाजपने गुन्हेगारीच्या मुद्यावर अनेक आंदोलने केली. नाशिकच्या सद्यस्थितीला आता हाच पक्ष जबाबदार आहे. या विषयावर काँग्रेस प्रथम पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी करेल. त्यानंतर गृहखात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन केले जाईल, असे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगत या प्रश्नावर शिवसेना गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले. शहरात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. गुंड खुलेआम फिरतात. हाणामारी, प्राणघातक हल्ले यावर भूषणावह पध्दतीने चर्चा होते. हा शहरासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. या संदर्भात शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी विशेष पोलीस निरीक्षक व पोलीस आयुक्तांची बैठक घेतली होती. त्यानंतर शिवसेनेने या प्रश्नावर मोर्चाही काढला. तथापि, परिस्थितीत बदल झाला नाही. गुन्हेगारी इतक्या मोठय़ा प्रमाणात राजकीय वरदहस्त असल्याशिवाय वाढू शकत नाही. गुन्हेगारांना कोणाचा वरदहस्त आहे याचा शोध घेतला गेला पाहिजे. बिहारला लाजवेल इतक्या मोठय़ा प्रमाणात गावठी कट्टे व पिस्तुल सापडत आहेत. भाजपचे स्थानिक आमदार काही बोलण्यास तयार नाही. पालकमंत्र्यांनी पोलिसांची बैठक घेऊन या स्थितीचा आढावा घेण्याची गरज होती. परंतु, तसे काहीच घडत नसल्याकडे बोरस्ते यांनी लक्ष वेधले. या प्रश्नावर वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. सर्वसामान्यांना सोबत घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.