पावणेपाच लाख नमुन्यांची चाचणी

नाशिक : विभागात आतापर्यंत तब्बल पावणेपाच लाख व्यक्तींचे नमुने घेण्यात आले असून त्यापैकी एक लाख ५८ हजार ४५३ अर्थात ३३.४५ टक्के व्यक्तीचे अहवाल सकारात्मक आलेले आहेत. उपचाराअंती एक लाख २८ हजार ५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर करोनामुळे विभागात आतापर्यंत ३२६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१४ टक्के असून मृत्यूदर २.०६ टक्के आहे. सद्यस्थितीत २६ हजार ६०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

विभागातील करोनास्थितीची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पटणशेट्टी यांनी दिली. २४ तासात विभागात ३००५ रुग्ण बरे झाले.

याच काळात नव्या ३००१ रुग्णांची भर पडली. तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत चाचणी घेतलेल्यांपैकी तीन लाख ११ हजार ७९ जणांचे अहवाल नकारात्मक आले. ११४२ जणांचे नमुने अनिर्णित राहिले.

अद्याप अडीच हजार व्यक्तींचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६२ हजार ५०७ रुग्ण आढळले. त्यातील ५१ हजार २६१ रुग्ण उपचाराअंती करोनामुक्त झाले. ११५५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १० हजार ९१ रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या ४४ हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. त्यातील ३२ हजार ३३६ रुग्ण बरे झाले तर १०९१ रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत नऊ हजार ८७६ रुग्ण उपचार घेत आहेत.

धुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या ११ हजार ५०५ वर पोहचली असून त्यातील १० हजार ९७ जण बरे झाले. सध्या १०६३ रुग्ण उपचार घेत आहेत. गुजरातलगत असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या पाच हजारावर पोहचण्याच्या मार्गावर आहे.

उपचारानंतर तीन हजार ३३२ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. १३२१ जण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसात अहमदनगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरला आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ३७७ रुग्ण आढळले. त्यापैकी ३१ हजार ५५८ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले. ५६६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४२५३ रुग्ण उपचार घेत आहेत.

५७०५ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात

आरोग्य विभागाच्या अहवालानुसार विभागात सध्या २६ हजार ६०४ व्यक्ती उपचार घेत आहेत. यातील पाच हजार ७०५ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.  तर ३० हजार ९५७ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत. वाढत्या रुग्णांमुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत आहे. ज्या रुग्णांच्या घरी स्वतंत्रपणे निवासाची व्यवस्था आहे. देखभालीसाठी इतर व्यक्ती आहे.

त्यांना गृहविलगीकरणाचा सल्ला दिला जातो. त्यामुळे बहुतांश रुग्णांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.