20 September 2020

News Flash

पाच महिन्यांनंतर पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा रुळावर

पहिल्या दिवशी मनमाड परिसरातील ३२८, तर नाशिक परिसरातील ३२० प्रवाशांनी प्रवास केला

नाशिक रोड रेल्वे स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवेश करणाऱ्यांच्या बॅगा, पिशव्या निर्जंतूक करण्यात आल्या.    (छाया-यतीश भानू)

जिल्ह्य़ातून मुंबईला नोकरी, रोजगार, व्यापारानिमित्त ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेली पंचवटी एक्स्प्रेस पाच महिन्यांनंतर शनिवारपासून पुन्हा रुळावर आली. परंतु, एक्स्प्रेसमधून आरक्षण केलेल्यांनाच प्रवास करण्याची मुभा असल्याने पहिल्या दिवशी मनमाड परिसरातील ३२८, तर नाशिक परिसरातील ३२० प्रवाशांनी प्रवास के ला. खासदार हेमंत गोडसे, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे, प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे तसेच रेल परिषदेतर्फे  एक्स्प्रेसचे स्वागत करण्यात आले.

शनिवारी सकाळी अत्यंत दिमाखात पण करोनाचे नियम  पाळून मनमाड  जंक्शन रेल्वे स्थानकातून मुंबईसाठी पंचवटी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. पहिल्या दिवशी मनमाड  परिसरातल्या ३२८ प्रवाशांनी या गाडीचा लाभ घेतला. परंतु नियमित पासधारक आणि सामान्य प्रवाशांना प्रवासाला परवानगी नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. करोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात प्रवासी वाहतूक सेवेवर निर्बंध आले. मनमाड-नाशिक-मुंबई धावणारी पंचवटी एक्स्प्रेसही त्यामुळे पाच महिन्यांत धावली नाही. टाळेबंदी काहीअंशी शिथिल करण्यात आल्यावर रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांनी केली. विशेषत: पंचवटी एक्स्प्रेस सुरू  करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर ही मागणी मान्य होऊन शनिवारपासून पंचवटी एक्स्प्रेस पाच महिन्यांनंतर पुन्हा धावू लागली. या एक्स्प्रेसमध्ये १७१४ आसन व्यवस्था असून त्यात द्वितीय श्रेणीचे  १५२२, आणि वातानुकू लित १९२ आसन आहेत. त्यातील २० टक्के ही तिकिटे विकली गेली नाहीत. शुक्रवारी सायंकाळी साडेसहापर्यंत द्वितीय वर्गाची  २७३, तर वातानुकु लित वर्गाची सहा तिकिटे विकली गेली होती. मुंबईला जाण्यासाठी ९० रुपये तिकिटाचे आणि ३० रुपये आरक्षणाचे असे १२० रुपये द्यावे लागत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे तिकिटासाठी रोजचा एकूण २४० रुपये खर्च लक्षात घेता महिन्याला सात हजार २०० रुपये खर्च होणार आहे. एरवी मासिक पास काढला तर फक्त ६०० रुपये लागतात.

पंचवटी एक्स्प्रेस बंद असताना नोकरदार नोकरी टिकविण्यासाठी दुचाकी, खासगी वाहनाने मुंबई गाठत होते. त्यांना महिन्याला किमान २५ हजार रुपये खर्च येत असे.  पासधारकांना आरक्षण नसल्याने तिकीट काढावे लागत आहे. घरापासून मुंबईपर्यंत प्रवासासाठी जाऊन—येऊन नऊ तास लागतात. त्यात आणखी तीन तासांची भर पडली आहे. कारण गाडी सुटण्याच्या आधी प्रवाशांना  दीड तास आधी स्थानकात हजर रहावे लागणार आहे.  करोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येते. प्रवासापूर्वी थर्मल स्क्रिनिंगसाठी किमान ९० मिनिटे अगोदर यावे लागते. करोनाबाबतचे निकष, नियम यांचे पालन करावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 12:15 am

Web Title: panchavati express resumes after five months abn 97
Next Stories
1 काँग्रेसचे ‘रोजगार दो’ आंदोलन
2 विजेच्या लपंडावामुळे नाशिककर हैराण
3 मनमाडात सम-विषम तत्वाची पुन्हा कठोरपणे अंमलबजावणी
Just Now!
X