डब्यांचे फलकही बदलण्याचा प्रकार

मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस या गाडीच्या एका डब्याचा फलक काढून ऐन गाडी सुटण्याच्या वेळेला दुसऱ्या डब्याला लावला जात असताना विरोध करणाऱ्या प्रवाशांना शिवीगाळ, दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. या प्रकरणी अ‍ॅड. शिवाजी वनारेंसह इतर वकिलांनी रेल्वे सुरक्षा दल ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपासून मनमाड येथून सकाळी सुटणाऱ्या गोदावरी एक्स्प्रेसमधील मासिक पासधारक डब्यात काही सरावलेल्या पासधारकांची दादागिरी वाढली आहे. त्यातून हा प्रकार पुढे आला आहे. काही दिवसांपूर्वी संतोष मुणोत या प्रवाशाने सर्वसाधारण डब्यात बसलेल्या प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हुसकावले. सर्वसाधारण डब्याला लावलेला फलक काढून तेथे ‘एमएसटी’चा (मासिक पासधारक) फलक लावला. या प्रकाराला शिवाजी वनारे, त्यांच्या इतर सहकारी वकिलांनी विरोध केला असता त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून गाडीतून फेकून देण्याची धमकी देण्यात आली. याबाबत वनारे यांनी रेल्वे सुरक्षा पोलीस कार्यालयात तक्रार दिली. पोलिसांनी दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध शिवीगाळ, धमकावणे तसेच रेल्वे कायद्यान्वये फलकात बदल केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे.

पासधारक डब्यात सर्वसाधारण तिकीट असणाऱ्यांना बसू दिले जात नाही. बसले तर संघटितपणे शारीरिक, मानसिक त्रास दिला जातो. जाण्या-येण्याचा रस्ता बंद केला जातो. असे प्रकार वारंवार घडतात. याबाबत रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासनीसांचे या डब्याकडे असणारे दुर्लक्ष यामुळे अनेक विना तिकीटवाल्याचे फावते, अशी तक्रार करत त्याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी वनारे यांच्यासह इतरांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, रेल्वे पोलीस निरीक्षक के. डी. मोरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांना अटक केली जाणार असल्याचे म्हटले आहे. पुढील काळात असे प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल. या प्रकरणी संतोष मुणोतसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर त्वरित कारवाई होईल, असे मोरे यांनी सांगितले.