*  गृह विलगीकरणातील रुग्णही मनपा रुग्णालयात * जिल्हा रुग्णालय-महापालिकेच्या माहितीत तफावत

नाशिक : नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासकीय यंत्रणांमधील असमन्वय विविध कारणांवरून वारंवार अधोरेखित होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊ लागले आहेत. जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या माहितीत तफावत आढळत असल्याने गोंधळ निर्माण होत असून  रुग्णांना यातून उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

करोनाची दैनंदिन आकडेवारी जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेमार्फत दिली जाते. या दोन्ही यंत्रणा सायंकाळी आपापला अहवाल प्रसिद्ध करतात. नाशिक महापालिकेचा अहवाल शहराच्या हद्दीपुरता मर्यादित असतो, तर जिल्हा रुग्णालय जिल्ह्य़ाची करोनाची स्थिती देते. करोना रुग्णांची अचूक आकडेवारी प्रसारमाध्यमांना दिल्याबद्दल खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यंतरी करोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख डॉ. अनंत पवार यांना खास प्रशस्तिपत्रक दिले होते. जिल्हा रुग्णालयाकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या अहवालात विविध स्वरूपांत माहिती दिली जाते. यात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती असते. मंगळवारच्या अहवालात जिल्हा रुग्णालयात ११२, नाशिक मनपा रुग्णालये, डीसीएचसी आणि सीसीसी अर्थात करोना काळजी केंद्रात असे तिन्ही मिळून ३३१९ आणि डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात १४४, मनपा मालेगाव रुग्णालय, डीसीएचसी, सीसीसीमध्ये १४१, नाशिक ग्रामीण भागातील डीसीएचसी आणि सीसीसीमध्ये ६३५ असे एकूण ४९९८ रुग्ण उपचार घेतल्याचे म्हटलेले आहे. यावरून नाशिक शहरातील सर्व रुग्ण मनपा रुग्णालये आणि महापालिकेमार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या डीसीएचसी आणि सीसीसीमध्ये उपचार घेत असल्याचे वाटते. महापालिकेच्या अहवालावर नजर टाकल्यास जिल्हा रुग्णालयाची माहिती परस्परविरोधी असल्याचे लक्षात येते. मंगळवारी महापालिकेने १५०१ जणांचे नमुने घेतले. त्यापैकी ११५७ जणांचे अहवाल नकारात्मक आले, तर ३४४ जणांचे अहवाल सकारात्मक आले. यातील २५३ जणांचे गृह विलगीकरण करण्यात आले. नव्या रुग्णांमुळे शहरातील बाधितांची एकूण रुग्णांची आकडेवारी ३१०१ वर पोहोचली. ज्यांच्याकडे प्रशस्त घर आहे आणि देखभालीची सुविधा आहे, त्यांना त्यांच्या घरात विलगीकरणात ठेवले जाते.  महापालिकेच्या अहवालानुसार आतापर्यंत २६९३ रुग्णांचे गृह विलगीकरण करण्यात आले. सद्य:स्थितीत सुमारे ८०० रुग्ण गृह विलगीकरणात असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या ऑनलाइन माहितीवरून त्याची अधिक स्पष्टता होते. एकूण खाटांपैकी २२०० खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. यात महापालिकेच्या रुग्णालयात ६०७, तर अतिदक्षता विभागातील ३७४ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित खासगी रुग्णालये, डीसीएचसी आणि सीसीमध्ये असतील, असे सांगितले जाते.

गोंधळात भर

शहरात सध्या ३३१९ रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिकेच्या माहितीनुसार यातील बरेचसे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, परंतु जिल्हा रुग्णालयाच्या लेखी शहरातील सर्वच्या सर्व रुग्ण मनपा रुग्णालये, डीसीएचसी आणि सीसीसीमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती देण्यात येते. मुळात लक्षणे नसणारे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे गृह विलगीकरण केले जाते. असे असतानाही घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात समाविष्ट करण्याच्या प्रकाराने गोंधळात भर पडत आहे.