आरोग्य अधिकारी, करोना कक्ष अधिकाऱ्यांसह चौघे बाधित

नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आघाडीवर प्रयत्नरत असलेल्या महापालिकेतील वैद्यकीय आणि आरोग्य विभागात या आजाराचा शिरकाव झाला आहे. महापालिकेचे वैद्यकीय-आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, करोना कक्षाचे प्रमुख आवेश पलोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटय़े या तीन डॉक्टरांसह औषध विक्रेता असे एकूण चार जण बाधित झाल्यामुळे या विभागातील ३० ते ३५ जणांची चाचणी करावी लागणार आहे. करोना नियंत्रणाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता यामुळे वर्तविली जात असली तरी दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

करोनाकाळात आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दैनंदिन कामात बाधितांच्याही संपर्कात येत होते. आधीपासून अति जोखीम गटात त्यांचा समावेश होता. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षभरापासून चाललेल्या लढाईत वैद्यकीय-आरोग्य विभागाची जबाबदारी असणारे अधिकारी आता बाधित झाल्याचे उघड झाले आहे.  महापालिकेने सध्या करोनाचा जलद प्रसार करू शकणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याअंतर्गत दैनंदिन अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांपासून ते छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांपर्यंत सर्वाची चाचणी केली जात आहे.

महापालिकेचे १४ सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल सकारात्मक आले होते. चार दिवसांपूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेटय़े यांचा अहवाल सकारात्मक आला होता. त्यांच्या निकट संपर्कात डॉ. नागरगोजे आणि डॉ. पलोड होते. तीन ते चार दिवसांनी ते चाचणी करणार होते. तत्पूर्वीच रात्री काही लक्षणे जाणवून त्रास झाला. चाचणी केली असता अहवाल सकारात्मक आल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विभागातील एक औषध विक्रेताही बाधित आहे. अलीकडेच आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती.

आता ३० ते ३५ जणांची पुन्हा चाचणी केली जाणार आहे. काही अधिकारी बाधित झाल्यामुळे दैनंदिन व्यवस्थापनावर फारसा परिणाम होणार नसल्याचे डॉ. नागरगोजे यांनी म्हटले आहे. करोनाकाळात बहुतांशी कामकाज भ्रमणध्वनीवर संपर्क साधून के ले जात होते. आज आणि यापुढेही ते भ्रमणध्वनीद्वारे सुरूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.