News Flash

जिल्ह्य़ात ५६ गुन्हे दाखल, १२० जणांना अटक 

*  भ्रमणध्वनीवरील इंटरनेट सेवा लवकरच सुरू  *  संवेदनशील गावातील संचारबंदीही मागे घेतली जाणार *  पाच पोलिसांचीही चौकशी जिल्ह्य़ात भ्रमणध्वनीवरील बंद असणारी इंटरनेट सेवा तसेच त्र्यंबक

*  भ्रमणध्वनीवरील इंटरनेट सेवा लवकरच सुरू 
*  संवेदनशील गावातील संचारबंदीही मागे घेतली जाणार
*  पाच पोलिसांचीही चौकशी
जिल्ह्य़ात भ्रमणध्वनीवरील बंद असणारी इंटरनेट सेवा तसेच त्र्यंबक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी परिस्थितीचा अंदाज घेऊन लवकरच मागे घेण्यात येईल. शहर व ग्रामीण भागातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मागील पाच दिवसांत शहर व जिल्ह्य़ात एकूण ५६ गुन्हे दाखल झाले. त्यातील १२० हून अधिक संशयितांना अटक करण्यात आली. या काळात समाजमाध्यमांवर वादग्रस्त संदेश आणि ध्वनिचित्रफीत पोस्ट केल्या प्रकरणी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या बाबतची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे आणि पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या काळात सार्वजनिक मालमत्तेचे जवळपास दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखताना कामात कुचराई केल्याच्या कारणावरून पाच कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीतील निष्कर्षांवरून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तळेगावच्या घटनेनंतर सलग चार ते पाच दिवस समाजकंटकांकडून नाशिक शहर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील नागरिक वेठीस धरले गेले. या काळात प्रारंभी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आक्षेप घेतला गेला. पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केल्यानंतर शहर व ग्रामीण भागातील वातावरण निवळण्यास सुरुवात झाली. दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले. संवेदनशील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

या पाश्र्वभूमीवर, शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. अफवा रोखण्यासाठी सोमवारपासून बंद ठेवण्यात आलेले भ्रमणध्वनीवरील इंटरनेट सेवा लवकरच सुरू केली जाईल. त्र्यंबक व इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये लागू असणारी संचारबंदी शिथिल करण्याचा विचार आहे.  परिस्थिती लक्षात घेऊन त्याबाबत उचित निर्णय घेतला जाईल, असे चौबे यांनी नमूद केले. ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण २७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्या प्रकरणी ८२ संशयितांना अटक करण्यात आली. सहा गुन्हे हे अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल करण्यात आले आहे. समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या व कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिक शहरात ७२ संशयितांविरुद्ध २० गुन्हे दाखल आहेत. त्यातील ३५ संशयितांना अटक झाल्याची माहिती पोलीस आयुक्त सिंघल यांनी दिली. सहा गुन्हे अदखलपात्र असून त्यातील एकाही संशयिताला अटक झालेली नाही. या काळात समाजमाध्यमांवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी सायबर क्राइमअंतर्गत सात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील एक गुन्हा फेसबुकवर वादग्रस्त माहिती टाकल्याचा आहे. शहर व ग्रामीण भागात शांतता प्रस्थापित होत असल्याने भ्रमणध्वनीवरील इंटरनेट सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले.

जनजीवन सुरळीत झाले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चौबे व सिंघल यांनी केले. दरम्यान, वातावरण पूर्वपदावर आले असले तरी एसटी महामंडळाने मुंबई, कसारा व इगतपुरीसाठीची बससेवा सुरू केलेली नाही. यामुळे नागरिकांचे हाल होत असून त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेणे भाग पडले आहे.

वातावरण दूषित करण्यात निवडणुकांचेही कारण
नाशिक : शहर व ग्रामीण भागात उफाळलेल्या स्थितीला राजकीय किनार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील इच्छुक व राजकीय पदाधिकाऱ्यांनी वातावरण दुषित करण्यास हातभार लावल्याचे समोर येत आहे. चौकशीत राजकीय मंडळींची नावे पुढे आल्यास त्यांनाही ताब्यात घेण्याची तयारी करण्यात आली आहे.

शहर व ग्रामीण भागात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत जेरबंद झालेले संशयित प्रामुख्याने १८ ते ३० वयोगटातील आहेत. ताब्यात घेतलेले समाजकंटक नोकरी, शिक्षणाऐवजी उनाडक्या करणारे असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ताब्यात घेतलेले मुले कोणत्या राजकीय पक्ष किंवा विशिष्ट संघटनेशी संबंधित आहेत का, त्यांना कोणी चिथावणी दिली याचा तपास केला जात आहे. त्यात कोणाचा सहभाग निष्पन्न झाल्यास राजकीय मंडळींना पोलीस ताब्यात घेणार आहे. दोन घटकात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असला तरी त्यामागे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आगामी महापालिका निवडणूका आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणारे तसेच राजकारणात सक्रिय असणाऱ्यांनी या स्थितीचा गैरफायदा घेतल्याचे तपास अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. शहरात गुन्हा दाखल झालेला भाजपवासी नगरसेवक पवन पवार, माजी नगरसेवक गणेश उन्हवणे, शशिकांत उन्हवणे अशी ही काही उदाहरणे आहेत. ग्रामीण भागातही असे काही घटक असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिका आणि जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले. या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना या स्थितीचे निमित्त साधून अनेकांनी आपले हिशेब पूर्ण करण्याकडे लक्ष दिले. शहरातील काही गुन्हेगारी टोळ्यांनी या स्थितीचा लाभ उठवत गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या सर्व घटना आणि त्यामध्ये अटक झालेल्या संशयितांची पाश्र्वभूमी यांचा आढावा घेण्याची तयारी तपास यंत्रणेने केली आहे.

माथेफिरू युवकांचे काम

या वादात एक विशिष्ट घटक एका मुद्दावरून सक्रिय राहिला. त्यामुळे दोन घटकात तेढ निर्माण झाली. यात पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित हे युवक असून किरकोळ नोकरी किंवा शिक्षण घेणारे आहेत. बेरोजगारीतून आलेले नैराश्य अथवा माथेफिरूपणा त्यांनी अशा कामांसाठी वापरला.

किशोर नवले (स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ अधिकारी, नाशिक ग्रामीण)

गरज पडल्यास राजकीय मंडळीची चौकशी

पोलीस आयुक्तालय हद्दीत अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात काही राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. चौकशीत मोठी नावे समोर आली तर त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येईल.

सचिन गोरे (सहाय्क पोलीस आयुक्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2016 5:03 am

Web Title: police arrested 120 in nashik violence incident
Next Stories
1 उमलती पिढी ‘सुजाण’ घडविण्याचा एक प्रयत्न
2 नेत्रांगांसाठी पाच जिल्ह्यंमध्ये ब्रेल ग्रंथालय
3 बैठय़ा चाळीच्या ठिकाणी पोलिसांसाठी बहुमजली इमारत
Just Now!
X