जळगाव जिल्ह्य़ातील पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायतेची पोलीस यंत्रणेमार्फत खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. बुधवारी येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात रायतेची चौकशी करण्यात आली. दुसरीकडे याच प्रकरणातील अन्य संशयित जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची चौकशी व अन्य कागदपत्रांची छाननी करण्यासाठी दुसरे पथक जळगावला पाठविण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्य़ात कार्यरत असणारे आणि अलीकडेच निलंबित झालेले पोलीस निरीक्षक अशोक गोरक्षनाथ सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभाकर रायते व वाळू तस्कर सागर चौधरी या तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. वाळू माफीया चौधरीशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे संबंध असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
या प्रकरणात संशयितात पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याने तपास यंत्रणा सावधगिरीने पावले टाकत आहे. या घडामोडी सुरू असताना वाळू माफीया चौधरीने नाशिकच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आत्महत्येपूर्वी सादरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस अधीक्षक सुपेकर व पोलीस निरीक्षक रायते यांच्या छळास कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे म्हटले होते. पैशांसाठी व दिवाळीत सोने दिले नाही म्हणून संबंधितांनी छळ केल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. यासह विविध मुद्यांच्या आधारे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात रायतेची चौकशी करण्यात आली. नाशिक पोलिसांचे एक पथक जळगावला रवाना झाले आहे.