मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला शहरातील उपनगर, भद्रकाली व अंबड याठिकाणी पोलिसांनी छापे टाकत २४ हजार ८०० रुपये किमतीचा नायलॉन व चायनीज मांजा जप्त केला. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यात नायलॉन मांजाला बंदी असतानाही काही दुकानदार बिनदिक्कतपणे मांजाची विक्री करत असल्यामुळे कारवाई सुरु आहे.

शहरातील पाच विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी उपनगर, भद्रकाली व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हेदाखल करण्यात आले. भद्रकालीतील सचिन पतंग स्टॉल दुकानातून ९०० रूपयांचा माजा जप्त करण्यात आला. तर याच ठिकाणी दूध बाजार येथील पतंग विक्रीच्या दुकानातून १५०० रुपयाचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी कुणाल मिसाळ व देवेंद्र सहाणे या विक्रेत्यांवर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचा: बंदी असूनही नायलॉन मांजाची सर्रास विक्री

 

उत्तमनगरमध्ये टाकलेल्या दोन छाप्यांत २६०० रूपयांचा मांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुरलीधर खैरे व गोपाळ ठाकरे या विक्रेत्यांवर अंबड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपनगर येथील इच्छामणी जनरल स्टोअर्सवरील छाप्यात १९ हजार ८०० रूपयांचा नॉयलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला. निलेश प्रकाश खत्री या विक्रेत्याविरूध्द याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाचा: संक्रांतीला पतंग जपून उडवा..

दरम्यान, मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वत्र पतंग उडवण्याचा आनंद सर्वांनी मनसोक्तपणे घ्यावा मात्र नायलॉन मांजाचा जर कोणी वापर करत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहेत. यासाठी पोलीस यंत्रणा गच्चीवर नजर ठेवणार आहे. लहान मुले जर नायलॉन मांजाद्वारे  पतंग उडवताना आढळली तर  त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे वरिष्ठ पोलिसांकडून सांगण्यात आले.