प्रसंगावधानता हा अत्यंत महत्त्वाचा गुण पोलिसांच्या अंगी आवश्यक असतो. कधीकधी पोलिसांनी एखादी कारवाई केली तर का केली, म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात. नाही केली तर का नाही केली, याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात. अशा वेळी होश आणि जोश यांचे तारतम्य बाळगून निर्णय घ्यायचा असतो, असे सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मंगळवारी येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत सोहळा झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. या सोहळ्यास दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.

दीक्षांत सोहळ्यानिमित्ताने पोलीस दलात ६६८ उपनिरीक्षकांची तुकडी दाखल झाली आहे. मागील आठवड्यात निरोप सोहळ्यात या तुकडीतील अनेकांनी करोना प्रतिबंधक नियम पाळले नव्हते. या संदर्भातील चित्रफिती समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर संबंधितांनी प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे सांगितले. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याचे स्वरूप ऐनवेळी ऑनलाइनमध्ये रूपांतरित केल्याचे सांगितले जाते. अर्थात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मर्यादित संख्येत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रबोधिनीने म्हटले आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. उपनिरीक्षकांचे कुटुंबीय, मित्र परिवाराला तो ऑनलाइन पाहायला मिळाला.

आज पोलीस दलासमोर दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या शत्रूंचे मोठे आव्हान आहे. एकीकडे आमचे पोलीस गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दिसतात. तर दुसरीकडे हेच पोलीस करोना संकटाला निकराने तोंड देताना दिसतात. करोना संकटातही पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केली नसल्याचे ठाकरे यांनी उपनिरीक्षकांना शुभेच्छा देताना सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक जाणीव ठेवून काम केल्यास पोलीस ठाण्यात मदतीसाठी आलेल्या सामान्य माणसाला न्याय देता येईल. तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून समाजात वावरणार आहात. सामान्य माणसाशी तुमचा संबंध येणार आहे. त्यांच्याशी तुम्ही कसे बोलता, कसे वागता, त्यांचे प्रश्न कसे सोडवता यावर तुमची, तुमच्या वरिष्ठांची आणि शासनाची प्रतिमा तयार होत असते, याकडे लक्ष वेधले. पोलीस प्रबोधिनीच्या मैदानावर पोलीस महासंचालक रजनीश शेठ, अपर पोलीस महासंचालक संजयकुमार, प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर आदी उपस्थित होते.

शुभांगी शिरगावे यांना मानाची पिस्तूल

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची पिस्तूल, उत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी, सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून अहिल्यादेवी होळकर चषक या तीनही पुरस्कारांच्या शुभांगी शिरगावे या मानकरी ठरल्या. सलीम शेख यांना उत्कृष्ट बाह््यवर्ग प्रशिक्षणार्थी तर अविनाश वाघमारे यांची द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून निवड  झाली.