महापालिका निवडणुकीच्या उंबरठय़ावर आपआपले राजकीय आरोग्य सुदृढ करण्याच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले असून राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या वतीने येथे रविवारी आयोजित महाआरोग्य शिबीरही त्यापासून अपवाद राहिले नाही. हे शिबीर म्हणजे एक शासकीय कार्यक्रम असल्याचे सांगणाऱ्या भाजपचे शिबिराच्या तयारीपासून असलेले संपूर्ण वर्चस्व उद्घाटन सोहळ्यापर्यंतही कायम राहिले. सत्तेत राहूनही सतत विरोधाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांनी आपणास निमंत्रण नसल्याचा दावा करीत शिबिरापासून दूर राहणे पसंत केले. जणू काही या शिबिराने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही राजकीय लस टोचली आहे.

जळगाव येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा दांडगा अनुभव असलेले वैद्यकीय शिक्षण व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गोल्फ क्लब मैदानावर मोठा गवगवा करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे रविवारी उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटक, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अध्यक्षाच्या भूमिकेत असल्याचे जाहीर करण्यात आलेल्या सोहळ्यास हे दोघे जण अनुपस्थित राहिले. उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावर भाजपचे मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक पदाधिकारी यांची वर्दळ असताना ‘सर्वपक्षीय’ मंडळी कुठेच दिसली नाहीत. शिबिराच्या आयोजनापासून आपणांस जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याने उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवला नसल्याचा आक्षेप भाजप वगळता इतर सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र सर्वपक्षीयांना निमंत्रण दिल्याचा दावा केला.

वास्तविक, महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘शासकीय’ म्हणून प्रचार करण्यात आलेल्या या शिबिराची सर्व सूत्रे प्रथमपासूनच आपल्या ताब्यात कशी राहतील हे भाजपच्या वतीने पाहण्यात आले. शिबिरासंदर्भात सर्वपक्षीयांची आयोजन बैठकही याआधी कधी झाली नाही. त्यामुळेच सर्वपक्षीय या शिबिरापासून दूर राहिले. शहराचे महापौर व मनसेचे नेते अशोक मुर्तडक यांनी आमंत्रणच नसल्याने उद्घाटन सोहळ्यास कसा जाणार, असा प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनीही हीच भूमिका मांडली. काँग्रेसचे शहर अध्यक्ष शरद आहेर यांनी तर जनतेच्या पैशातून भाजप स्वत:चा प्रचार करून घेत असल्याचा आरोप केला. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांना उद्घाटन सोहळ्यापासून अनुपस्थित राहण्यासाठी चंदनपुरी येथे आयोजित घरातीलच ‘दिवटय़ा बुधल्या’ कार्यक्रमाचे आयतेच कारण मिळाले. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी मात्र हे सर्व आरोप खोडून काढत महापौरांसह सर्वानाच आमंत्रण दिल्याचा दावा केला. हा काही घरातला कार्यक्रम नव्हता. ज्यांनी शिबिरासाठी कष्ट घेतले, ते श्रेय घेतीलच, असेही त्यांनी नमूद केले. एकूणच, निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर होणाऱ्या या शिबिरास विरोधकांनी उपस्थित राहणे भाजप तसेच विरोधकांच्याही राजकीय आरोग्यासाठी प्रतिकूल ठरले असते. त्यामुळेच विरोधक आमंत्रण नसल्याची, तर भाजप आमंत्रण दिल्याचा दावा करीत असल्याने कोण खरे, कोण खोटे हाच संभ्रम आहे.