देशभरातील १३५ हून अधिक संग्राहक सहभागी
शालेय विद्यार्थी व तरुणाईत सर्जनात्मकता निर्माण होऊन त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागातर्फे येथे आयोजित महापेक्स २०१६ या राज्यस्तरीय फिलाटेली प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी आ. देवयानी फरांदे आणि महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते झाले. सलग तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात एकूण ४०० फ्रेम आणि १३५ हून अधिक तिकीट संग्राहक सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात विविध विषयांवरील सुमारे २५ हजार तिकिटे सादर करण्यात आली आहेत.
उपनगरच्या पोस्टल स्टोअर डेपो सभागृहात झालेल्या कार्यक्रमास मुख्य पोस्ट मास्तर अशोककुमार दाश, टलाल विभागातील एस. आर. फडके, डाकवस्तू भांडारचे अधीक्षक आर. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने टपाल विभागाने पांडवलेणी व कुसुम धिरुभाई मेहता यांच्या विशेष पाकिटांचे प्रकाशन करण्यात आले. प्रदर्शनात भारतीय सभ्यता, संस्कृती, क्रीडा, कला, आध्यात्मिक, व्यक्तिमत्त्वे, क्रांतिकारक अशा वेगवेगळ्या व वैशिष्टय़पूर्ण विषयांवरील टपाल तिकिटे ठेवण्यात आली आहेत. तिकिटांचा संग्रह करणे हा जगातील सर्वात लोकप्रिय छंद. भारतात जवळपास ५० लाख संग्रहणकर्ता तो जोपासतात. एखाद्या लहानशा टपाल तिकिटावर विविध विषयांची माहिती असू शकते याची अनुभूती प्रदर्शनातून मिळत आहे. देशाचा वारसा, इतिहास, नैसर्गिक देणगी, कला-साहित्य आणि संस्कृती चित्रित करणारी टपाल तिकिटे देशातील व्यक्ती, संस्था व संघटनांना सन्मानित करण्याचे प्रतीकात्मक साधन आहे. फिलाटेलीच्या प्रयोगाकडे मुलांचे मानसिक क्षितिज विस्तृत करण्यासाठी प्रभावी शैक्षणिक साधनांच्या स्वरूपात पाहिले जाते. या स्पर्धात्मक प्रदर्शनात राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवरील संग्राहक सहभागी झाले आहेत. वैविध्यपूर्ण माहिती तिकिटांच्या माध्यमातून मिळते.
झायलो प्लास्ट अलॉय कारखान्यात वरिष्ठ व्यवस्थापकपदाची धुरा सांभाळणाऱ्या आनंद काकड या संग्राहकाची पक्ष्यांच्या ‘प्लेजंट’ प्रजातीची माहिती देणारी तिकिटे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. या प्रजातीत मोर, बदक, कोंबडा, क्रुस यांच्यासह अनेक युरोपीयन पक्ष्यांचा समावेश होता. हे पक्षी खातात काय, कुठे वास्तव्य करतात, त्यांच्या नावाशी साधम्र्य साधणारे नाव जगात कुठे कुठे वापरले जाते याचा पट या तिकिटांवरून उलगडला जातो. काकड यांच्याकडे या विषयावरील तब्बल पाच हजार तिकिटांचा संग्रह असून प्रदर्शनात त्यांनी पाच फ्रेम मांडल्या आहेत. अशा विविध रोचक विषयांची माहिती शालेय विद्यार्थ्यांनी तिकिटांच्या माध्यमातून समजावून घेतली. प्रदर्शनाच्या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत पहिल्या दिवशी ‘जादूचे प्रयोग’ दाखविण्यात आले. प्रदर्शनात टपाल विभागाने आपल्या स्टॉलद्वारे विविध बचत योजनांची माहिती दिली.