|| अनिकेत साठे

नाशिक : द्राक्ष हंगाम मध्यावर आला आहे. दिवाळीतील अवकाळी पावसाने उत्पादन घटले. उन्हाची तीव्रता वाढल्याने द्राक्षात साखर उतरून मालदेखील लवकर तयार होत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना सध्या किलोला सरासरी ६५ ते ७५ आणि देशांतर्गत बाजारात २५ ते ४० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर १५ ते २० रुपयांनी उंचावले आहेत. उत्पादन कमी असल्याने निर्यातदारांना दर्जेदार द्राक्षे शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

पिंपळगाव बसवंत येथील युवराज मोरे या उत्पादकाने सभोवतालच्या द्राक्ष परिसरातील स्थिती कथन केली. नैसर्गिक संकटातून वाचलेल्या बागांमधील द्राक्षे सध्या भाव खात आहेत. काही उत्पादकांना गत वर्षीपेक्षा दुप्पट पैसे झाले. जास्त क्षेत्र असणाऱ्यांचे पावसात झालेले नुकसान भरून निघाले. अवकाळीने हंगामाच्या एकूण द्राक्ष उत्पादनात घट झाल्याने त्याचा परिणाम दरवाढीत झाला. गारव्यामुळे जानेवारी अखेपर्यंत देशांतर्गत बाजारात द्राक्षांना उठाव नव्हता. थंडी ओसरली, तशी मागणी वाढू लागली. पुढील काळात दर आणखी उंचावतील, असा अंदाज द्राक्ष बागाईतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी व्यक्त केला. अनेक जण हंगामनिहाय फळ खाण्यास प्राधान्य देतात. मालाच्या तुटवडय़ामुळे अखेरच्या टप्प्यात उत्पादकांना दरवाढीचा लाभ मिळेल, असे ते सांगतात. गेल्या वर्षी मुबलक उत्पादनामुळे वेगळी स्थिती होती. स्थानिक बाजारात १५ ते २० रुपये किलोने व्यापारी खरेदी करण्यास तयार नव्हते. या हंगामात चित्र पूर्णत: बदलले आहे. निर्यातीसाठी माल शोधण्याची वेळ आली आहे.

निर्यातक्षम द्राक्षांना प्रारंभी १०० ते ११० रुपयांदरम्यान भाव मिळाले होते. आवक वाढल्यानंतर मार्चमध्ये दर २० ते २५ रुपयांनी कमी झाल्याचे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी सांगितले. उत्पादन घटल्यामुळे मागील हंगामाप्रमाणे निर्यातीचा पल्ला गाठता येणार नसल्याचे जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी मान्य केले. माल कमी असल्याने निर्यातीत फरक पडेल. पण मोठा परिणाम होणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय द्राक्षे मुख्यत्वे सागरी मार्गाने पाठविली जातात. जादा दर मिळवण्याच्या प्रयत्नात काही निर्यातदारांनी हवाई मार्गाचाही अवलंब केला. अशाच एका प्रयत्नात जर्मनीमध्ये पाठविलेल्या काही द्राक्षांत कीटकनाशकाचे अंश सापडल्याने काही काळ अडचणींना तोंड द्यावे लागले. याविषयी निर्यातदार फारसे बोलत नाहीत. आता सर्व प्रक्रिया सुरळीत असल्याचे सांगितले जाते. त्या घटनेचा निर्यातीवर परिणाम झाला नसल्याचे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.

गत वर्षीच्या तुलनेत निर्यात कमीच

भारतीय द्राक्षांसाठी युरोप, रशिया, मलेशिया, बांगलादेश ही मोठी बाजारपेठ आहे. युरोपात आतापर्यंत ३८४९ कंटेनरमधून ५१ हजार ४८६ मेट्रिक टन द्राक्षे पाठविण्यात आली. मागील वर्षी याच सुमारास ४७२५ कंटेनर अर्थात ६३ हजार ४०८ मेट्रिक टन इतकी निर्यात झाली होती. या वर्षी नेदरलॅण्डमध्ये (२५५०), युनायटेड किंगडम (४४७), जर्मनी (४४१), डेन्मार्क १०२, फिनलॅण्ड (५१), सोल्व्हेनिया (४३) कंटेनर पाठविण्यात आले. तसेच आर्यलड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्टिया, स्वीडन, इटली, पोर्तुगाल, स्पेन या देशांमध्ये हे प्रमाण २२ ते १२ कंटेनर असे आहे. बांगलादेश, रशिया आणि इतरही अनेक देशांमधील निर्यातीची आकडेवारी उशिराने उपलब्ध होते. परंतु तिथेही काही अंशी निर्यात कमी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जाते.