News Flash

टाळेबंदीतही महिला बचत गटांची सक्रियता

मुखपट्टय़ा निर्मितीपासून किराणा माल विक्रीपर्यंत विविध उपक्रम

संग्रहित छायाचित्र

मुखपट्टय़ा निर्मितीपासून किराणा माल विक्रीपर्यंत विविध उपक्रम

चारूशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : करोनामुळे लागु झालेली टाळेबंदी आणि त्यामुळे रुतलेले अर्थचक्र..स्थलांतरितांचा प्रवास.. उघडय़ावर पडलेले संसार..कामधंदा नसल्याने शून्यात हरवलेले चेहरे, अशी सर्व परिस्थिती असतांना हे दृष्टचक्र जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात सक्रिय असलेल्या बचत गटातील महिलांनी भेदले.

करोनाच्या टाळेबंदीतही  संधी शोधत त्यांनी आपल्या अर्थार्जनाचे मार्ग बदलले. करोनामुळे लागु झालेल्या टाळेबंदीेचे दुष्परिणाम वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत असतांना आजही टाळेबंदीत सुटलेला रोजगार, निर्माण झालेला उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी  विशिष्ट वर्गाला संघर्ष करावा लागत आहे. ग्रामीण भागात शेतीशी संबंधित बहुतांश उद्योग असतांना टाळेबंदीत गावबंदीमुळे या कामालाही अप्रत्यक्ष फटका बसला.

अशा स्थितीत भविष्यातील गरजा लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या माध्यमातून कामास सुरूवात केली. टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात महिलांनी करोनाचे संकट ओळखत मुखपट्टी तयार करण्यास आणि विक्री करण्यास सुरूवात केली. या माध्यमातून २५३ स्वयंसहाय्यता समुहातील एकूण ६६७ महिलांनी चार लाख, ६७ हजार ६९३ मुखपट्टीची निर्मिती केली. त्यातून ४६ लाख, ५३ हजार, ७४९ रुपयांची प्राप्ती केली. तसेच अभियानअंतर्गत २१० समुहांनी १७ लाखांहून अधिक रकमेचा भाजीपाला, फळांची विक्री केली. त्या माध्यमातून आठ लाखाचा नफा झाला. याशिवाय २९ स्वयंसहाय्यता समूह गटांनी आपल्या गावात किराणा दुकान सुरू करून पाच लाखांहून अधिकची उलाढाल केली. याशिवाय आरोग्य विषयक प्रबोधनासाठी जिल्ह्य़ात स्वयंसहाय्यता समूह गटातील महिलांनी ‘हात धुवा मोहीम’ राबवली. खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून कृषी विभागाच्या समन्वयाने जिल्ह्य़ात दोन हजाराहून अधिक प्रशिक्षण वर्ग घेत यामध्ये बीज प्रक्रियेची माहिती मिळवली.

दरम्यान, गटातील काही महिलांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता गटातील खेळते भांडवल वापरत त्यांना मदतीचा हात दिला. अन्न सुरक्षा अंतर्गत १५ हजार, ९२४ गरजू महिलांच्या कुटूंबाना आर्थिक मदत देण्यात आली, अशी माहिती प्रकल्प समन्वयक उज्वला बावके यांनी दिली.

 बचत गटांना ऑनलाइन बाजारपेठ मिळविण्याचे प्रयत्न

करोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. वेगवेगळी प्रदर्शने, मेळावे बंद असतांना बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी, कागदपत्रे, असा सर्व गुंता सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. गटातील महिलांनी या काळात कोणाकडून मदतीची अपेक्षा न ठेवता खऱ्या अर्थाने काळाची गरज ओळखत आपले काम सुरू केल्याने त्यांना बाजारपेठ किंवा अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागले नाही.

– उज्वला बावके , प्रकल्प समन्वयक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 2:52 am

Web Title: production of masks by women self help groups even in lockdown zws 70
Next Stories
1 जीप-दुचाकी अपघातात चार जण ठार
2 दोन घटनांमध्ये विवाहितांवर पतीकडून हल्ले
3 नाशिकमध्ये शेतकऱ्यांना माल विक्रीला अटकाव
Just Now!
X