सलग तीन ते चार दिवसांपासून हवामान विभाग नाशिक जिल्ह्य़ात अतिवृष्टीचा इशारा देत असले तरी प्रत्यक्षात अतिवृष्टी दूर, पण साधी रिमझिमही होत नसल्याचे चित्र आहे. मुंबईसह कोकण परिसरात पावसाने थैमान घातले आहे. नाशिक जिल्ह्य़ात दोन-तीन तालुक्यांचा अपवाद वगळता तो कुठेही दमदार स्वरूपात बरसलेला नाही. पावसाच्या प्रतीक्षेला दीड महिना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पाणीटंचाई, पेरणी अडचणीत आली आहे.

मागील तीन ते चार वर्षांत हंगामाच्या प्रारंभी हजेरी लावणारा पाऊस पुढे महिना, दीड महिना गायब झाल्याची उदाहरणे आहेत. त्याचा प्रत्यय येथे पुन्हा आला आहे. आतापर्यंत ३७०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी हे प्रमाण पाच हजार मिलिमीटरहून अधिक होते. या वर्षांचे वैशिष्टय़ म्हणजे आजवर जो काही पाऊस झाला, त्यात तीन तालुके प्रामुख्याने केंद्रस्थानी राहिले. त्यात इगतपुरी ९९६, पेठ ५५७, सुरगाणा ३९५ मिलिमीटर आणि याव्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर ३७०  मिलिमीटर यांचा समावेश आहे. हे चार तालुके वगळता इतरत्र रिमझिम असेच त्याचे स्वरूप राहिले. पावसाअभावी खरिपाचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. आतापर्यंत केवळ ३५ टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे झाली आहेत. पाऊसच नसल्याने शेतकरी पेरणी करण्यास तयार नाही.

अशी परिस्थिती असतानाही हवामान विभागाने ८ जुलैपासून अतिवृष्टीचे इशारे देण्यास सुरुवात केली आहे. सलग चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले गेले. या काळात योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले. मुंबईसह कोकण परिसरात अतिवृष्टीची अनुभूती येत असताना नाशिक जिल्ह्य़ातील अनेक भागांत मंगळवारी सकाळी उन्हाने सर्वाचे स्वागत केले.

अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या दिवसात जिल्ह्य़ात जेमतेम पाऊस पडल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. मागील २४ तासांत जिल्ह्य़ात केवळ १८ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात इगतपुरी तालुक्यात नऊ, तर पेठ तालुक्यात सहा, सुरगाण्यामध्ये तीन मिलिमीटर पावसाची नोंद आहे. उर्वरित १२ तालुक्यांत पावसाचा लवलेशही नाही. अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या इतर दिवसात वेगळे काही घडलेले नाही. ८ जुलै रोजी जिल्ह्य़ात ३०३, ९ जुलै रोजी केवळ ५२ मिलिमीटर पाऊस झाला. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

या वर्षी पावसाअभावी खरिपाची पेरणी अडचणीत आली आहे. एव्हाना पेरण्यांची ९० ते १०० टक्के कामे पूर्णत्वास जातात. यंदा हे प्रमाण केवळ ३५ टक्क्यांच्या आसपास आहे. पावसाअभावी पाणीटंचाईची समस्या कायम आहे. ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. ३० जूननंतर हे टँकरही बंद झाले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याने हे टँकर सुरू राहावे याकरिता प्रशासनाला प्रयत्न करावे लागत आहेत.

पावसाच्या प्रमाणात घट

मागील वर्षी १० जुलैपर्यंत जिल्ह्य़ात ५०७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा या तारखेपर्यंत हेच प्रमाण ३७०६ मिलिमीटरवर आले आहे. याचा विचार केल्यास जिल्ह्य़ात आतापर्यंत १३०० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. समाधानकारक पाऊस पडला, असे केवळ इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा हे तीन तालुके आहेत. नेहमीच्या तुलनेत त्या तालुक्यातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाळ्याचा दीड महिना उलटण्याच्या मार्गावर असताना घटलेले प्रमाण सर्वाची चिंता वाढविणारे ठरले आहे. पुढील अडीच महिन्यांत पावसाचा अनुशेष भरून निघणार की केवळ अतिवृष्टीच्या इशाऱ्यावर समाधान मानावे लागणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.